विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे : सुश्मिता देव

विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे : सुश्मिता देव

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : तीन महिन्यांनी होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे आणि राज्यात पुन्हा एकदा महिलांना न्याय देणारे काँग्रेसचे सरकार स्थापन करावे, असे आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी केले आहे.

येथील टिळक भवनस्थित प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात आज आयोजित महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी तसेच राजस्थानच्या महिला व बाल कल्याण मंत्री ममता भूपेश, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. चारुलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जेनेट डिसुझा, राष्ट्रीय सचिव नुरी खान, आकांक्षा ओला, संध्या सव्वालाखे, लिगल सेलच्या राष्ट्रीय समन्वयक सुशिबेन शहा, माजी प्रांताध्यक्ष कमलताई व्यवहारे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अजंता यादव, सोशल मीडिया राष्ट्रीय समन्वयक चित्रा बाथम, आमदार हुस्नबानो खलिफे आदी उपस्थित होते.

या बैठकीसाठी भरपावसातही संपूर्ण महाराष्ट्रातून महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या बैठकीला अॅड. चारुलता टोकस, सचिन सावंत, ममता भूपेश यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेस सक्षमपणे काम करीत असून, महिलांचे संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे चारुलता टोकस यांनी सांगितले. निवडणुकीला सामोरे जात असताना महिलांनी सशक्त उमेदवार म्हणून स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असे सचिन सावंत म्हणाले. तसेच परंपरागत पद्धतीने उमेदवारी न देता भविष्यात थेट जनतेशी संपर्क असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जावी आणि महिलांनी गांभिर्याने तळागाळापर्यंत संपर्क वाढवावा, असे ममता भूपेश म्हणाल्या.

अध्यक्षीय भाषणात माजी खासदार सुश्मिता देव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे महिलांच्या हक्कासाठी सातत्याने लढत असून, महिला काँग्रेस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त महिलांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत परंतु सध्याच्या काळात केवळ उमेदवारी किंवा पदाच्या मागे न जाता काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून महिलांनी काम केले पाहिजे,असेही त्या म्हणाल्या.

बैठकीच्या प्रारंभी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय मागे घेऊन यापुढेही अध्यक्ष म्हणून कायम रहावे, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. या बैठकीचे सूत्रसंचालन अॅड. जयश्री शेळके तर आभार प्रदर्शन डॉ. संजिवनी बिहाडे यांनी केले.

Previous articleसर्वांसाठी घरे : स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन
Next articleराष्ट्रीय कृषि उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी देवेंद्र फडणवीस