अटलजी केवळ भाजपाचेच नेते नव्हते तर ते देशाचे नेते

अटलजी केवळ भाजपाचेच नेते नव्हते तर ते देशाचे नेते

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार व  उत्तुंग व्यक्तिमत्व जिवंत करणारे, अतिशय अविस्मरणीय व अद्भूत अशा प्रकारचे अटल स्मृती उद्यान असून, हिमालयासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे अटल स्मृती उद्यान म्हणजे तरुण पिढीला कायमस्वरुपी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले

सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विकास मंत्री तथा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्रध्देय अटलजींच्या अटल स्मृती उद्यान चा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्यध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडला.

याप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतातील पहिल्या अटल स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा बोरीवली शिंपोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानंतर प्रबोधनकार नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले अटल स्मृती उद्यान म्हणजे विनोदजी यांच्या जीवनातील हे सर्वोत्तम काम आहे. हे केवळ उद्यान व स्मारक नाही तर अटलजी यांचे विचार व व्यक्तीमत्व जिवंत करणारे आहे. अटलजी आजही आपल्यामध्येच आहेत, त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी आपल्यासमोर आहेत, असे हे पहिलेच अटलजी स्मृती उद्यान असावे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.

अटलजी यांचे व्यक्तीमत्व म्हणजे अथांग सागराप्रमाणे होते. अटलजी यांनी आपल्या जीवनात संघर्ष करीत देशवासीयांमध्ये देशभक्तीची भावना रुजविली. त्यामुळे आजही अटलजी यांचे प्रेरक व्यक्तीमत्व व त्यांचे विचार देशासाठी दिशादर्शक आहेत. अटलजी यांनी नवभारताची संकल्पना देशवासीयांमध्ये रुजविली आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवभारताची संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

अटलजी केवळ भाजपाचेच नेते नव्हते तर ते देशाचे नेते होते, असे सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले की, अटलजी यांच्या विचाराचे पठण व मार्गदर्शन आजही दिशादर्शक आहे. अटल स्मृती उद्यान म्हणजे केवळ उद्यान नव्हे तर अटलजी यांचे विचार व त्याचे व्यक्तीमत्व येणाऱ्या युवा पिढीसाठी जिवंत करणारे नक्कीच ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अटल स्मृती उद्यानाची निर्मिती म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांना वाहिलेली आदरांजली आहे. हे उद्यान म्हणजे अटलजी यांचे विचार, त्यांचा सहवास, त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे नेतृत्व आजही आपल्या बरोबर आहे आणि ते आपल्याशी संवाद साधत आहेत, असा भास या स्मृती उद्यानाच्या माध्यमातून नक्कीच होतो, असे उ्दगार अटल स्मृती उद्यानाची संकल्पना साकारणारे सांस्कृतिक कार्यमंत्री व उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी काढले.

Previous articleराधाकृष्ण विखे पाटील ठरले क्रमांक तीनचे मंत्री
Next articleचैत्यभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही