भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उद्या मुंबई दौ-यावर
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत असून शनिवार व रविवारी त्यांचे मुंबईत विविध कार्यक्रम होणार आहेत. मुंबईत आगमन झाल्यानंतर ते विमानतळावरील छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत.या निमित्ताने मुंबई भाजपकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे,
कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे उद्या शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल व तेथे कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत केले जाईल. आगमनानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. शनिवारी सायंकाळी भाजपा कार्यालय, वसंतस्मृती, दादर येथे ते प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष, खासदार आमदार तसेच अन्य बैठकांमध्ये मार्गदर्शन करतील. ते रविवारी सकाळी दादर येथे चैत्यभूमीला अभिवादन करतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भेट देऊन वंदन करतील. ते रविवारी गुंडवली, अंधेरी येथे भाजपाच्या बूथ समितीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. तेथे त्यांच्या हस्ते भाजपाची सदस्यता नोंदणी करण्यात येईल आणि वृक्षारोपण करण्यात येईल. त्यानंतर मा. जे. पी. नड्डा गोरेगाव, मुंबई येथे भाजपा विशेष प्रदेश कार्यसमिती बैठकीचे उद्घाटन व मार्गदर्शन करतील. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहतील. भाजपा प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांच्यासह पक्षाचे राज्यातील केंद्रीय पदाधिकारी आणि केंद्रीय मंत्री या बैठकीस हजर राहणार आहेत. भाजपाचे राज्यातील सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, मंडल सरचिटणीस, खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, भाजपाचे राष्ट्रीय परिषद व राज्य परिषद सदस्य असे हजारो प्रतिनिधी विशेष कार्यसमिती बैठकीस उपस्थित राहणार आहेत.