काँग्रेसला उर्जित अवस्थेकडे न्यायायचे आहे

काँग्रेसला उर्जित अवस्थेकडे न्यायायचे आहे

मुंबई नगरी टीम

मुंबई : १९७८ ला इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता, त्यावेळी काँग्रेस राहणार नाही असेच चित्र होते, परंतु काँग्रेसने पुन्हा भरारी घेतली.आता कठीण परिस्थिती आहे, दोन्ही ठिकाणी त्यांची सत्ता आहे, अशा वेळी काँग्रेसला उर्जित अवस्थेकडे न्यायायचे आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने आोयजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. जातीच्या, धर्माच्या नावावर राजकारण करणे सोपे असते परंतु विचारसरणीने काम करणे अवघड आहे, काँग्रेसचा विचार शाश्वत आहे. शेवटी शाश्वत विचारच कायम टिकतो. गरिबांच्या मनात आजही काँग्रेस असून, ही लढाई तत्वांची, विचाराची आहे, दोन विचारांचा संघर्ष देशात सुरू आहे. आताचे राजकारण बदलले आहे, पूर्वी काय बोलायाचे आणि काय समोर आणले जायचे हे ठरलेले होते परंतु आता नको त्या गोष्टी समोर आणण्याची मानसिकता बनली आहे अशी टीका त्यांनी केली.सात निवडणुका मी जिंकल्या मंत्री म्हणून मी काम केले आहे. महाराष्ट्रातले जिल्हे, मतदारसंघ माहीत आहेत, विरोधी नेते, कार्यकर्ते मला माहीत आहेत, मी महाराष्ट्रात खूप फिरलो आहे,त्याचा उपयोग मला पुढच्या काळात काम करताना होईल असेही थोरात म्हणाले.

आमची ताकत आमचा कार्यकर्ता आहे.लोकसभेला आमचा एकच खासदार निवडुन आला, आता काय होणार असे प्रश्न विचारले जातात, परंतु असे होत असले तरी लोकसभा आणि विधानसभा या वेगळ्या असतात. येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता वेगळा विचार करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील भाजप सेनेच्या सरकारने भ्रामक वातावरण तयार केले आहे, पाच वर्षात राज्याची मोठी अधोगती झाली असे सांगतानाच पीक विम्यासाठी मोर्चा काढता तोही चुकीच्या कंपनीवर अशी टीका त्यांनी शिवसेनेवर करीत,सरकार तुमचे आहे तुम्ही नुकसान भरपाई ची रक्कम का देत नाही असा सवालही केला. मी कृषिमंत्री होतो, आम्ही प्रश्न समजून घ्यायचो, या सरकारने कधीही प्रश्न समजून घेतले नाही म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न गंभीर झाले, शेतकऱ्यांना खरीपासाठी केवळ ३० टक्के कर्ज वाटप झाले आहे.आज बियाणे, मशागतीसाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत.आज जो भास निर्माण केला आहे, त्याचा पर्दाफाश आम्हाला करायचा आहे असेही थोरात म्हणाले.

विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, सीपीआय, सीपीएम आणि वंचितला बरोबर घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत.मनसेचा अजून प्रस्ताव आला नाही, त्यामुळे चर्चा झाली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बदल निश्चित होणार असे वाटतेय, लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा ऐकल्या,त्याचे म्हणण सगळयांना पटलं पण त्याचे मतामध्ये परिवर्तन झाले नाही, ई.व्ही एममुळे सगळीकडे शंकेचे वातावरण आहे त्यामुळे  निवडणूक आयोगाने ही शंका दूर केली पाहिजे असे सांगून आगामी विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर  घ्याव्यात अशी भूमिका  त्यांनी व्यक्त केली.भाजपची राजनीती पाहिली तर सगळीकडे ते साम, दाम, दंड भेद करून यश मिळवत आहेत, काहीही करून कोणत्याही मार्गाने सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहेत, जे घडत आहे ते जनता पाहत आहे.राज्यात अनेक ठिकाणी  भाजपचे लोक खोट्या अफवा पसरवतात वातावरण प्रदूषित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, विरोधी पक्षातील लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून त्यांना हतबल करून ते आपल्याकडे ओढत आहेत, आणि ही पद्धत अत्यंत दुर्दैवी आहे असे सांगतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी  एकत्र लढू आणि आमचाच मुख्यमंत्री असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous articleराणे यांनी निवडणूक लढवू नये, अन्यथा पराभवाची हॅटट्रिक
Next articleएमटीएनएल आगीची चौकशी होणे आवश्यक : आशिष शेलार