गायमुख-मीरा रोड मेट्रो मार्गास मंत्रिमंडळाची मान्यता

गायमुख-मीरा रोड मेट्रो मार्गास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई नगरी टीम

मुंबई : गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-१० च्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या मार्गाची एकूण लांबी ९.२०९ किमी आहे. यापैकी ८.५२९ किमी उन्नत तर ०.६८ किमी भुयारी मार्ग आहे. यामध्ये एकूण ४ उन्नत स्थानके असतील. प्रकल्पाची किंमत सुमारे ४ हजार ४७६ कोटी रुपये इतकी आहे. मार्च २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पासाठी एमएमआरडीए व राज्य सरकार यासह आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे अर्थसहाय्य घेण्यासाठीही मान्यता देण्यात आली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देत असतानाच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे, त्यासोबत आवश्यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएला नियुक्त करणे या बाबींनाही मान्यता देण्यात आली आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी १४ लाख ३२ हजार दैनंदिन प्रवासी सीएसएमटी-वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख-शिवाजी चौक (मिरा रोड) या मार्गाचा वापर करण्याची शक्यता असून २०३१ पर्यंत ही संख्या २१ लाख ६२ हजार होईल, असा अंदाज आहे. वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे-घोडबंदर परिसरातील वाढत्या नागरीकरणाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबई, बोरिवली, मिरा-भाईंदर, ठाणे ही शहरे जोडली जाऊन मेट्रोचे वर्तुळ पूर्ण होईल आणि वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.

Previous articleहृदय प्रत्यारोपण झालेल्या धनश्रीच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला अकरा हजारांचे योगदान
Next articleवडाळा-सीएसएमटी मेट्रो मार्गास मंत्रिमंडळाची मान्यता