राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड भाजपच्या वाटेवर ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर हे हातात शिवबंधन बांधणार असतानाच दुसरीकडे अहमदनगर मधिल अकोलेचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पिचड यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार वैभव पिचड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
एकीकडे मुंबईतील राष्ट्रवादीचा गड खिळखिळा होत असतानात आता अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला सुरूंग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीचे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांनी काल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री मधुकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. आमदार वैभव पिचड हे त्यांचे पुत्र आहेत. मधुकर पिचड हे राज्यात अनेक वर्ष मंत्री होते. राज्याच्या आदिवासी मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मुधकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.अकोले मतदार संघ हा शिवसेनेकडे असल्यामुळे वैभव पिचड यांनी शिवसेना प्रवेशासाठी चाचपणी केली होती.जर खांदेपालट झाली तर भाजप नाही तर शिवसेना असा निर्णय त्यांनी घेतला होता.