“सुपर ३०” हिंदी चित्रपट टॅक्स फ्रि
मुंबई नगरी टीम
मुंबई : बिहारमधील प्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंदकुमार यांच्या कार्यावर आधारित “सुपर ३०” या हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आनंदकुमार यांनी “रामानुजन स्कुल ऑफ मॅथेमेटिक्स्”च्या माध्यमातून बिहारमधील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हुशार विद्यार्थ्यांना जे.ई.ई. व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. त्यांचे अनेक विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झालेले आहेत. त्यांच्या कार्यावर आधारित सुपर ३० हा हिंदी चित्रपट अलीकडे प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटातून आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश मिळू शकते, असा संदेश दिलेला आहे.
या चित्रपटातील सामाजिक संदेश सर्व समाजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील राज्य वस्तू व सेवा कराची (एसजीएसटी) सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार प्रेक्षकांकडून एसजीएसटी वसूल न करता, चित्रपटगृहाकडून भरणा करुन घेण्यात येणार आहे. त्यांनतर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीतील तिकीट विक्रीवर भरणा झालेल्या एसजीएसटीचा परतावा शासन निर्णयातील तरतुदींनुसार चित्रपटगृहांना दिला जाणार आहे.