नाही तर लोक म्हणाले असते “गेले अमित शहांना भेटायला”
मुंबई नगरी टीम
मुंबई : सध्या सुरू असेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या नेत्यांना आपल्या मिश्किल भाषेत चिमटा काढला.
निमित्त होते माजी संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील लिखित विधानगाथा या पुस्तक प्रकाशन, या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. गेले काही दिवस राष्ट्रवादीचे मोठ मोठे नेते राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करीत आहे. आज राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र शरद पवार यांची आपल्या मिश्किल शब्दात भाजपला चिमटा काढला.
काल रात्री माझ्या गळ्याची आणि जिभेची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी मला जास्त बोलण्यास आणि कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मनाई केली होती. मात्र सध्याची राजकिय परिस्थिती पाहता जर मी आजच्या कार्यक्रमाला हजर राहिलो नसतो तर पत्रकार छापतील “मी गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शाह यांना भेटायला गेलो”. म्हणून थोडा त्रास झाला तरी मी आलो”. पवारांच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री सर्वश्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते.