मुख्यमंत्र्यांच्या  महाजनादेश यात्रेला तुफान प्रतिसाद

मुख्यमंत्र्यांच्या  महाजनादेश यात्रेला तुफान प्रतिसाद

मुंबई नगरी टीम   

नागपूर:  तुम्ही आम्हाला परत जनादेश देणार का, तुम्ही मोदीजींना आशीर्वाद देणार का, तुम्ही नितीनजींना आशीर्वाद देणार का, तुम्ही मला आशीर्वाद देणार का आणि भाजपाला आशीर्वाद देणार का अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नांना दोन्ही हात वर करून हजारोचा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे “हो” उत्तर देतो आणि “देवेंद्रजी फडणवीस आगे बढो महाराष्ट्र आपके साथ है” या घोषणांनी आसमंत दुमदुमून जाते! हे गावोगावचे दृश्य आहे, महाजनादेश यात्रेचे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा शनिवारी तिसरा दिवस. गेल्या तीन दिवसात यात्रेने अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा पाच जिल्ह्यातून मार्गक्रमण केले. जिल्हास्थानी सकाळी पत्रकार परिषद आटोपून महाजनादेश यात्रेला प्रारंभ होतो. शनिवारी सकाळी नागपूरची पत्रकार परिषद आटोपून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश जत्रा मार्गस्थ झाली. नागपूर ते कामठी हा १५  किलोमीटरचा प्रवास पार करण्यासाठी यात्रेला तब्बल अडीच तासांचा अवधी लागला. रस्त्याच्या दुतर्फा हजारोंचा जनसमुदाय नागपूरच्या आपल्या लाडक्या सुपुत्राच्या स्वागतासाठी जमला होता. नागपूर शहरात यात्रेचे अभूतपूर्व स्वागत झाले. त्यानंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही ठिकठिकाणी लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली होती. जनतेमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळाले.

या तीन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेने ४९१ किलोमीटरचा प्रवास केला. प्रवासात पंचवीस विधानसभा मतदार संघांना ढवळून काढले गेले.  यात्रेच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार केवळ नऊ ठिकाणी मोठ्या जाहीर सभा तर बारा ठिकाणी छोटेखानी स्वरूपाच्या स्वागत सभा आयोजिल्या होत्या. स्वागत सभेच्या ठिकाणी मुख्यमंत्री आपल्या रथावरूनच लोकांना संबोधित करतील, असे ठरले होते. अन्य ठिकाणी जनतेला अभिवादन करून पुढे जातील असे वेळापत्रक व कार्यक्रम घोषित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मार्गावरच्या प्रत्येक गावात मुख्यमंत्र्यांना जनतेशी संवाद साधणे भाग पडत आहे. प्रत्येक गावात अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. छोट्या खेड्यांमध्येही हजारो लोक आपल्या लाडक्या नेत्याला ऐकण्यासाठी आतूर झालेले असतात. देवेंद्रजींनी संवाद साधावा अशी त्यांची इच्छा असते. मुख्यमंत्री देखील अत्यंत उत्साहाने सर्वांशी संवाद साधतात. पाच वर्षात केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा सांगितल्यानंतर देवेंद्रजी उपस्थितांना प्रश्न विचारतात तुम्ही आम्हाला पुन्हा जनादेश देणार का? लोकांचे उत्तर प्रचंड उत्साहात “हो” असे असते. पुन्हा मोदीजीँना आशीर्वाद देणार का, मला आशीर्वाद देणार का,भाजपाला आशीर्वाद देणार का अशा प्रश्नांची सरबत्ती मुख्यमंत्री करतात. जनतेकडून प्रचंड उत्साहात दोन्ही हात उंचावून “हो” असे उत्तर असते.

कष्टकरी, शेतकरी, मोठ्या संख्येने आलेल्या महिला, समाजाच्या विविध स्तरातील आबालवृद्ध प्रचंड उत्साहात “देवेंद्रजी तुम आगे बढो महाराष्ट्र आपके साथ है” अशा घोषणा देत असतात. कुठेही न थकता, न चिडता, न कंटाळता मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद सुरू असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक यात्रा निघाल्या. मात्र विकासाच्या मुद्द्यावर निघालेल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद अभूतपूर्व व ऐतिहासिक स्वरूपाचाच आहे.

Previous articleभूमिपुत्रांना ८० टक्के रोजगार न देणा-या उद्योगांवर कारवाई करणार
Next articleशिवस्वराज्य यात्रेत घुमणार नव्या “स्वराज्याचा नवा लढा”