पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार ? अजित पवार
मुंबई नगरी टीम
पुणे : आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा असा थेट सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला केला.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर खेड येथे पार पडली.त्यावेळी अजित पवार यांनी सरकारला हा सवाल उपस्थित केला.काल ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला त्याचे मी समर्थन करतो. चांगल्याला चांगलंच बोलले पाहिजे. आता पाकव्याप्त काश्मीर आपल्यात यावा ही भारतीयांची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने या सरकारने पाऊले उचलली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. स्थानिकांना रोजगारात ७५ टक्के जागा दिल्या पाहिजेत यासाठी सरकारमध्ये आल्यावर लगेच कायदा करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. ७१ हजार कोटीची कर्जमाफी आम्ही दिली. परंतु हे तीन वर्ष कर्जमाफी देत आहेत ही कसली यांची कर्जमाफी आहे असा संतप्त सवाल करतानाच पश्चिम महाराष्ट्रावर या सरकारने जास्त अन्याय केला आहे असा आरोपही पवार यांनी केला.
ओबीसी, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देतो सांगितले परंतु दिले नाही ही सगळी बनवाबनवी सुरु आहे असेही पवार म्हणाले.तुमचा पाठींबा आघाडीला हवा आहे. आम्ही चांगला कारभार करु आणि नाही केला तर त्याचा जाबही विचारु शकता असेही पवार म्हणाले. आमचे सरकार आणा सहा महिन्यात सर्व खात्यातील सगळ्या जागा भरुन दाखवतो असा जाहीर शब्द यावेळी पवार यांनी जनतेला दिला. सध्या जोरात सुरू असलेल्या पक्षांतरांवर पवार म्हणाले की,काही गेले, अजून जातीलही काळजी करु नका. तुम्ही आहात ना हीच पक्षाची ताकद आहे.पेरताना बघतात कुणीकडे काय पेरत आहेत हेही माहीत नाही हे कळेना असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.आता यात्रा काढत आहेत ते शेतकरी किती आहेत हे तुम्हाला माहीत आहे. यांचा शेतीशी काय संबंध आहे का? असा सवाल केला.आमच्याकडे अनुभव आहे. आम्ही अनेक खाती सांभाळली आहेत. शरद पवार यांच्या सारखा एक सक्षम नेता आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे जनतेने आम्हाला आशिर्वाद द्यावा असे आवाहन पवार यांनी केले.