महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठात येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात होणारी आगामी विधानसभा निवडणुक आणि जम्मू काश्मिरमधील परिस्थिती लक्षात घेता महाविद्यालयीन निवडणुकीत सुरक्षा पुरवणे शक्य नसल्याचे गृह विभागाने राज्य सरकारला कळवले होते. राज्यातील पोलीस दलाची प्राथमिकता राज्यातील सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करण्याची असल्याचे सांगत गृह विभागाने महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारे पत्र राज्य सरकारला पाठवले होते. त्यानुसार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणा-या राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुकांबाबत विविध विद्यापीठांनी शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार निवडणुका सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ९९ (११) (क) मध्ये बदलाबाबतची अधिसूचना व आदेश निर्गमित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.आता या महाविद्यालयीन निवडणुका नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात तब्बल २५ वर्षांनी या महाविद्यालयीन निवडणुका होणार आहेत.