धनंजय मुंडेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
मुंबई नगरी टीम
बीड : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे. त्यांचे आरोप केवळ राजकीय द्वेषातून असतात, हे आता जनतेला माहित झाले आहे असे सांगून मयत शेतक-यांच्या जमिनी लुबाडणारांना ‘वैद्यनाथ’ वर बोलण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेसने काल परळी येथे जो मोर्चा काढला ते एक नाटक होते. हा मोर्चा मुळातच पालकमंत्री पंकजा मुंडे यांना विरोध करण्यासाठी होता, हे सिद्ध झाले आहे. धनंजय मुंडे यांनी मोर्चात पंकजा मुंडे यांच्यावर केलेले आरोप हे केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले असून त्यांचा राजकीय द्वेष यानिमित्ताने पुन्हा उफाळून आला असल्याचे आ. धस यांनी म्हटले आहे. पोषण आहारा संदर्भात पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी केलेला आरोप तर हास्यास्पद आहे, एवढे मोठे संवेधानिक पद असताना कुठलाही अभ्यास न करता बेछूट आरोप करण्याची सवयच त्यांना लागली आहे, सभागृहात ते पंकजा मुंडे यांच्यावरील एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत, त्यामुळेच आता निवडणूकीचे निमित्त साधून हा रडीचा डाव ते खेळत आहेत असे ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष रसातळाला चालल्याने ते व त्यांचे नेते बिथरले असून आरोप करण्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत त्यामुळे आगामी निवडणूकीत जनता पुन्हा एकदा त्यांना चांगली अद्दल घडवणार आहे असे ते म्हणाले.
जगमित्र कारखाना काढतो म्हणून धनंजय मुंडे यांनी अनेक शेतक-यांच्या जमिनी लुबाडल्या, त्यांना खोटे चेक दिले, पैसे लाटले, याप्रकरणी शेतक-यांनी त्यांना कोर्टातही खेचले आहे. तोडपाणीचे राजकारण करता मग ‘त्या’ शेतक-यांचे पैसे का देत नाहीत? असा सवाल करून तुमचे शेतक-यांवर खरचं प्रेम असेल तर त्यांच्या लुबाडलेल्या जमिनीचा अगोदर हिशेब द्या मगच वैद्यनाथ कारखान्याबद्दल बोला असे आ. धस म्हणाले. लोकनेते मुंडे साहेबांच्या पश्चात पंकजा मुंडे यांनी कारखाना अतिशय हिंमतीने चालवला आहे, आतापर्यंत ऊस उत्पादकांना ६५ कोटीचे वाटप केले आहे, उर्वरित रक्कमही त्या लवकरच देणार आहेत, त्यासाठी कर्ज मंजूर होणारं आणि पैसे मिळणार असं दिसलं की सर्व माहिती घेऊन मोर्चा त्यांनी काढला तथापि पंकजा मुंडे यांनी कठीण परिस्थितीतून कारखान्याला बाहेर काढले त्यामुळे शेतक-यांचा त्यांच्यावर पुर्ण विश्वास आहे परंतु धनंजय मुंडे केवळ सुडाचे राजकारण करून संभ्रम निर्माण करत आहेत अशी टीका आ. धस यांनी केली आहे.