२२ मंत्र्यांचे ९० हजार कोटीचे भ्रष्टाचार सिद्ध करण्यास तयार
मुंबई नगरी टीम
कारंजा : भारतीय जनता पार्टी हाच सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष झाला असून युती सरकारच्या काळातील २२ मंत्र्यांच्या ९० हजार कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे सिद्ध करून दाखविण्यास आपण कधीही तयार आहोत अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.
जनसुराज्य यात्रेच्या दुसऱ्या दिवशी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते .यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख , खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री सुभाष ठाकरे, आमदार प्रकाश गजभिये ,जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे अमोल मिटकरी, शेख मेहबूब आदी उपस्थित होते. भाजपाचे नेते आज भ्रष्टाचारविरोधी भाषण ठोकत आहे. आणि त्याचवेळी इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना पवित्र करण्यासाठी भाजपात प्रवेश देत आहेत. आपल्या भ्रष्ट मत्र्यांना क्लिनचीट देत आहे. माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे की, एका मंचावर या तुमच्या २२ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी सिद्ध करतो असे मुंडे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाजनादेश यात्रेत लाखांमध्ये विहिरी, शेततळी बांधल्याची बतावणी केली. ज्याचा पत्ता कुणालाच लागलेला नाही. त्या गुप्त विहिरी असाव्यात, ज्या फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांना दिसतात. काही गोष्टी फक्त भाजपच्या पुण्यवान कार्यकर्त्यांनाच दिसतात. आपण फाटक्या नशीबाचे असा टोला मुंडे यांनी लगावला.महाराष्ट्र जलयुक्त केल्याच्या बाता मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मी सांगू ईच्छितो की आमच्या मराठवाड्यात ७०० फुटांवर बोर मारला तरी लोकांना पाणी मिळत नाही. पाणी नक्की कुठे मुरलं ? वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लावलेली ३८ कोटी वृक्ष पण भाजपच्या पुण्यवान कार्यकर्त्यांनाच दिसणार का ? असा खोचक टोला लगावला.
महाराष्ट्रात भीषण पूरपरिस्थिती असताना तिथल्या अधिकाऱ्याचे फोन लागले नाही, बोटी मिळत नव्हत्या. मुख्यमंत्री सहा दिवसांनी तिथे गेले. तेही फक्त हवेत घिरट्या मारल्या. त्यांच्या विश्वासू सहकारी महाजनांनी तर सेल्फीचा धडका लावला. कॅमेरामध्ये पाहून टाटा करत होते. काय बोलणार या पोरकटपणाला? असे म्हणत महाजन यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला.केंद्र सरकारने काश्मिरवरील ३७० कलम काढून टाकला चांगली गोष्ट आहे. पण तरुणांच्या रोजगाराचे काय? राज्यातील उद्योग क्षेत्राचे काय? अनेक कंपन्या बरबाद होत आहेत, लोकांचा रोजगार जात आहे. अशा निष्क्रिय लोकांना घरी पाठवा आणि शिवस्वराज्य आणा असे आवाहन मुंडे यांनी केले.