मराठवाडा दुष्काळमुक्त करणारच

मराठवाडा दुष्काळमुक्त करणारच

मुंबई नगरी टीम

लातूर : मराठवाड्याने किती वर्ष दुष्काळ सहन करायचा असा प्रश्न आहे. मराठवाडा वॉटरग्रीड योजना आणि कोकणात वाहून जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे १६७ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणणे या दोन उपायांनी मराठवाड्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला.

महाजनादेश यात्रेदरम्यान लातूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रुंगारे, खा. विकास महात्मे, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, आ. सुधाकर भालेराव, आ. सुरेश धस, जिल्हाध्यक्ष नागनाथ अण्णा निळवदे आणि भाजपा विभागीय संघटनमंत्री भाऊराव देशमुख उपस्थित होते.

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपैकी चार वर्षे मराठवाड्यात दुष्काळ आहे. मराठवाड्याने किती वर्षे दुष्काळ सहन करायचा हा प्रश्न आहे. मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पहायला लागणार नाही. मराठवाडा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करू. मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेत ६४,००० किलोमीटरची पाईपलाईन टाकून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडण्यात येतील व प्रत्येक शहरात आणि गावात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यात येईल. त्यासाठी औरंगाबाद व जालना जिल्ह्यांचे टेंडर निघाले आहे तर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे टेंडर लवकरच काढण्यात येईल. ही योजना पूर्ण झाल्यावर मराठवाड्यात कधीही पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ राहणार नाही आणि टँकरची गरज पडणार नाही. पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी अडवून मराठवाड्यात गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणण्याची दुसरी योजना आहे. या योजनेचा जलआराखडा तयार झाला आहे. जलपरिषदेने त्याला मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. एकूण योजनेपैकी २५ टीएमसी पाण्यासाठीचा डीपीआर तयार झाला आहे. ऊर्वरित तयार होत आहेत. या योजनेसाठी कितीही निधी लागला तरी खर्च करू. या दोन योजनांच्या आधारे मराठवाड्याला कायमचा दुष्काळमुक्त करू.

हे गरिबांचे सरकार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे की, गरीबांना मदत करा. प्रत्येक गरीबाला घर मिळाले पाहिजे, त्या घरामध्ये पिण्याचे पाणी, वीज, शौचालय आणि स्वयंपाकाचा गॅस दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे. मोदीजींच्या योजना महाराष्ट्रात कार्यान्वित झालेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत लाखो घरे बांधली आहेत आणि आर्थिक  सामाजिक सर्वेक्षणात नोंद असलेल्या सर्व गरीबांना या वर्षअखेर घरे मिळतील तर इतर गरीबांना पुढच्या दोन वर्षांत घरे मिळतील. झोपडपट्टीवासियांनाही जमिनीचे पट्टे देऊन घरासाठी मदत करत आहे. २०२१ नंतर महाराष्ट्रात कोणीही बेघर राहणार नाही. आपले सरकार सत्तेवर येण्यापूर्वी महाराष्ट्रातील तीन लाख कुटुंबे बचतगटांशी जोडलेली होती आता ४० लाक कुटुंबे जोडली गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे.

ते म्हणाले की, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि मुख्यमंत्री जनआरोग्य योजना याच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गरजूला मोफत उपचार सुरू केले आहेत. गेल्या पाच वर्षात चाळीस लाख लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तुमच्या घराजवळ कोणी गरीब गरजू असेल तर त्याचेही मोफत ऑपरेशन करून देऊ. लाखो लोकांचे जीव वाचविण्याचे काम सरकारने केले आहे.

त्यांनी सांगितले की, आपले सरकार गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी काम करणारे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ही योजना आपल्या सरकारने प्रत्यक्षात उतरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बलशाली भारत निर्माण होत आहे. त्यामध्ये मजबूत आणि समृद्ध महाराष्ट्र तयार करण्यासाठी जनादेश द्यावा.अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मराठवाडा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करू शकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागांवर भाजपाला विजयी करायचे आहे.

Previous articleभाजप सरकारच्या अनियोजनामुळेच आर्थिक विकास गडगडला
Next articleकाँग्रेसला धक्का !  आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत जाणार