स्वबळावर लढल्यास भाजपला १६० जागा
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या भाजपा आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असतानाच विधानसभा निवडणूका भाजपा स्वबळावर लढल्यास भाजपला किमान १६० जागांवर विजय मिळेल असे भाकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविले आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणातही शिवसेनेशी असलेली युती तुटून स्वबळावर लढल्यास भाजपला १६० जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पाच महिन्यापूर्वी देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळून, राज्यातही भाजप-शिवसेना युतीने राष्ट्रवादी आणि कॅांग्रेसला धोबीपछाड दिली होती. सध्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे.या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी चाचपणीही सुरु असतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा स्वबळावर लढल्यास किमान १६० जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपाने केलेल्या सर्वेक्षणानुसार महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. पण युती तुटल्यास भाजपला १६०, शिवसेना ९० तर काँग्रेस-राष्ट्रवादी केवळ ३८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना-भाजप एकत्र लढल्यास युतीला २३० जागांवर विजय मिळेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र केवळ 58 जागांवर समाधान मानावे लागेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.