आचारसंहितेच्या धसक्याने मंत्रालयात लाखोंची गर्दी
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात होणा-या विधानसभा निवडणूकांची आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता असल्याने आज मंत्रालयात लाखाच्या आसपास अभ्यागतांनी गर्दी केल्याचे चित्र होते.गेली अनेक वर्षे सरकार दरबारी लटकलेले काम हाता वेगळे करण्यासाठी राज्यातील जनतेने मंत्रालयात धाव घेतल्याने मंत्र्यांची आणि अधिका-यांची दालने गर्दीने फुलून गेली होती.
विधानसभा निवडणूकांची आचारसंहिता साधारणत: गणेश विसर्जनानंतर लागण्याची शक्यता गृहीत धरून आपले सरकार दरबारी अडलेली कामे उरकून घेण्यासाठी राज्यातील विविध भागातून सुमारे लाखो अभ्यागतांनी मंत्रालयात धाव घेतल्याने मंत्रालयातील नियोजन विस्कळीत झाल्याची चर्चा आज दिवसभर मंत्रालयात होती.आचारसंहितेपूर्वी आपले काम हाता वेगळे व्हावे या अपेक्षेने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वार आणि गार्डन गेट जवळील पास खिडकीवर सकाळपासूनच जनतेने मोठी गर्दी केल्याचे चित्र होते.तर मंत्रालयात लवकर प्रवेश मिळावा यासाठी काही जणांनी सकाळी सकाळीच खिडक्यावर रांगा लावल्या होत्या.सर्वसामान्य नागरीकांना दुपारी दोन नंतर प्रवेश दिला जात असल्याने दुपारनंतर या दोन्ही प्रवेशपत्रिका खिडक्यावर तोबा गर्दी उसळळ्याचे चित्र पाहवयास मिळाले.
ज्या प्रमाणे प्रवेशपत्रिकेसाठी गर्दी उसळली होती तशीच गर्दी मंत्रालयात प्रवेश करण्या-या दोन्ही प्रवेशद्वारावर असल्याने पोलीसांचीही तारांबळ उडाल्याचे स्पष्ट दिसत होते.लाखोच्या संख्येने मंत्रालयात आलेल्या सर्वसामान्य जनतेमुळे आज मंत्रालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. मंत्रालयाच्या सहाही माळ्यांवर असेलेल्या मंत्रालायाच्या दालनातही तोबा गर्दी होती.संबंधित मंत्री नसतील तर अभ्यागतांनी अधिका-यांच्या दालनात धाव घेतल्याने अधिका-यांच्या दालनात मोठी गर्दी बघायला मिळत होती.एकाच दिवशी झालेल्या गर्दीमुळे मंत्रालयातील उपहारगृहावर ताण पडल्याचे चित्र होते. उपहारगृहातील असलेले खाद्यपदार्थ दुपारच्या सुमारास संपले होते.खाद्यपदार्थ संपल्यामुळे सर्वसामान्य जनतेला चहाचा आधार घ्यावा लागला मात्र शेवटी दुध संपल्याने जनतेला काळ्या चहावरच तहान भागवावी लागली.