महाजनादेश यात्रेच्या प्रचारार्थ डिजिटल चित्ररथ सज्ज
मुंबई नगरी टीम
पुणे : भारतीय जनता पक्षाचे सदस्य,वरिष्ठ पत्रकार व कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या अनोख्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या चित्ररथाचे आज खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते टिळक चौकात उदघाटन झाले.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने हा रथ तयार करण्यात आला असून, याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक महेश लडकत, राजेश येनपुरे, अजय खेडेकर, आदित्य माळवे, स्वप्नाली सायकर,कसबा स्विकृत सदस्य राजू परदेशी, प्रल्हाद सायकर, सुभाष देशमुख, तेजस गाडे, विशाल सांडभोर, अमित सोनावणे, अनिल माने, समीर भुत्ते, सिध्दार्थ गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार बापट म्हणाले, “महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणेकरांच्या भेटीला येत आहेत. पुणेकर जनता त्यांच्या स्वागताला उत्सुक आहे. नागरिकांची आवड, कल आणि सोय लक्षात घेऊन हा चित्ररथ माने यांनी अत्यंत कल्पकतेने तयार केला असून या प्रभावी प्रचारतंत्रामुळे पुणेकरांचा अपेक्षेपेक्षाही उदंड प्रतिसाद या यात्रेस लाभेल, अशी खात्री वाटते. “
माने म्हणाले की, आजपासून संपूर्ण शहरात पुढील चार दिवस हा रथ फिरणार आहे. या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे, योजना आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची निवडक भाषणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आम्ही योजिले आहे. याबरोबरच शहराच्या कानाकोपर्यातून जे या यात्रेत सहभागी होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी यात्रेचा मार्ग, ठिकाण, वेळ अशी उपयुक्त माहिती देखील आम्ही या माध्यमातून देणार आहोत. हा वेगळा प्रयत्न पुणेकरांचा पसंतीस उतरावा आणि अधिकाधिक पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे या यात्रेत सहभागी व्हावे, हाच आमचा यामागील उद्देश आहे.