सांगली, कोल्हापूरच्या पुरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नियोजन

सांगली, कोल्हापूरच्या पुरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नियोजन

मुंबई नगरी टीम

 कराड : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागात आलेल्या पुरामुळे प्रचंड हानी झाली. त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निर्णय घेतले आहेतच. पण पाऊस अधिक झाल्यानंतर नद्यांमधून वाहून जाणारे जास्तीचे पाणी दुष्काळी भागात वळवणे आणि पूर आला तरी रस्ते वाहतूक, वीज पुरवठा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कायम चालू राहण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे असे दुहेरी उपाय करून पुराच्या संकटावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची दीर्घकालीन योजना आपले सरकार आखत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कराड येथे सांगितले.

महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, श्रीमंत छत्रपती उदयनराजे, यात्राप्रमुख व प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, प्रदेश सचिव अतुल भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख, आ. शिवाजीराव नाईक आणि राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजीत शिवाजीराव देशमुख यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला.

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागात पूर आला. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गासह विविध ठिकाणी प्रचंड मोठी हानी झाली. सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवश्यक सर्व निर्णय घेतले आहेत. पण सर्वात महत्त्वाची बाब आहे की पावसाचा कल बदलला आहे. सातशे टक्क्यांपर्यंत पाऊस पडला. हे ध्यानात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेची मदत घेतली आहे.

ते म्हणाले की, जपानमध्ये सातत्याने पूर असतात. पण तेथे महापूर आल्यानंतर हानी होत नाही. अनेक देशांमध्ये वर्ल्डबँकेने असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. त्या दृष्टीने जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेची २२ तज्ज्ञांची तुकडी नुकतीच येऊन गेली. त्यांनी अभ्यास केला. कायमस्वरुपी पुराच्या संकटापासून मुक्ती मिळण्यासाठी पायाभूत सुविधा कशा निर्माण करायच्या याची दीर्घकालीन योजना करत आहोत. त्यासाठी जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक आर्थिक मदत करेल आणि संपूर्ण तांत्रिक सहकार्य करेल.

त्यांनी सांगितले की, या भागात पूरामुळे होणारी हानी रोखण्यासाठी दोन उपाय करण्यात येतील. या परिसरातील सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि गावातले रस्ते तसेच वीज पुरवठ्याच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा महापुरात कधीही बंद कराव्या लागणार नाहीत अशा पायाभूत सुविधा उभारायच्या आहेत. पुराचा धोका ध्यानात घेऊन घरांची रचना करावी लागेल. त्याचबरोबर पुरामुळे नदीमध्ये जास्तीचे पाणी आले की ते पाणी दुष्काळी भागात वळवणे हा आणखी एक उपाय आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरण हा तसाच एक उपाय आहे. लवादाने मंजूर केलेल्या पाण्यापेक्षा हे जास्तीचे पाणी असल्याने आंतरराज्य पाणीवाटपावर परिणाम होत नाही. हे दोन उपाय केल्यानंतर पुन्हा असे संकट येणार नाही याची काळजी घेणारी योजना बनवत आहोत.

पाकिस्तानी नागरिकांची प्रशंसा करणारे एक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री म्हणाले की, शरद पवार हे बडे नेते आहेत. पण त्यांनी विधान करताना हा विचार केला पाहिजे की आपल्या वक्तव्याचा लाभ भारताला होईल की पाकिस्तानला होईल. काँग्रेस नेते राहुल गांधी अशा प्रकारे काश्मीरविषयी केलेल्या विधानाचा उपयोग पाकिस्तानने भारताविरुद्ध तक्रार करण्यासाठी केला. निवडणुकीत मते मिळावीत यासाठी अशा प्रकारे बोलणे योग्य नाही. शरद पवार यांना माहिती नाही की, भारतातील मुसलमानांना देशाचा अभिमान आहे. शरद पवार यांना असे वाटत असेल की, मुसलमानांसमोर त्यांनी पाकिस्तानची प्रशंसा केल्यानंतर ते त्यांना मते देतील तर असा विचार करणे अन्यायकारक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या मानसिकतेत आली आहे हे त्यावरून स्पष्ट होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता  फडणवीस म्हणाले की, आपल्यावर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केले की उद्योगाच्या बाबतीत देशात पहिल्या तीन स्थानांमध्ये असणारा महाराष्ट्र त्यांच्या काळात आठव्या क्रमांकावर गेला. याचे त्यांनी आधी उत्तर दिले पाहिजे. नीति आयोग आणि रिझर्व्ह बँकेचे अहवाल पहावे, महाराष्ट्रात अभूतपूर्व गुंतवणूक झाली आहे. राज्यात देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक झाली आहे. लघु व मध्यम उद्योगांमध्ये गुंतवणूक झाल्यावर गुंतवणूक व रोजगार याची नोंद करावी लागते. ही सर्व आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. प्रॉविडंट फंडाची आकडेवारी केंद्र सरकारने घोषित केली आहे व त्यावरून स्पष्ट होते की, देशात जेवढा रोजगार निर्माण झाला त्याच्या २५ टक्के एकट्या महाराष्ट्रात निर्माण झाला. रोजगार निर्मितीच्या बाबतीत कोणीही महाराष्ट्राच्या बरोबरीला नाही. पण पृथ्वीराज चव्हाण दिशाभूल करत बोलत आहेत.

 फडणवीस म्हणाले की, छत्रपती उदयनराजे यांनी निवडून आल्यावर तीन महिन्यात राजीनामा देऊन लोकशाहीचा खून केला, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. आणीबाणी लादून लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेसला लोकशाहीबद्दल बोलायचा अधिकारच नाही. उदयनराजे यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना कोणतीही अट घातलेली नाही. त्यांनी एकच मुद्दा सांगितला की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर एखादे पंतप्रधान आणि राजकीय पक्ष कलम ३७० रद्द करण्याची हिंमत दाखवतात आणि भारत एकसंध ठेवण्याची हिंमत दाखवितात, त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर ३७० कलमाच्या बाजूने बोलून तसे मतदान करणार असेल तर छत्रपतींचे घराणे म्हणून आमच्यासाठी देश पहिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगावे की, ते कलम ३७० च्या बाजूने आहेत की विरोधात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि मजिद मेमन यांनी संसदेत ३७० कलम कायम ठेवण्याच्या बाजूने भाषणे केली. छत्रपती उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशानंतर सातारा जिल्ह्यात अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून टीका करणे सुरू झाले आहे. या टिकेला जनताच उत्तर देईल.भारतीय जनता पार्टी  शिवसेना महायुतीसंदर्भात आमचा संवाद नीट चालू असून हा संवाद निष्कर्षापर्यंत जाईल आणि आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous articleसत्ता आल्यास आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ५ हजार रुपयांची वाढ
Next articleकेंद्रीय निवडणूक आयोग उद्या निवडणुक तयारीचा आढावा घेणार