मुख्यमंत्री फक्त मंत्र्यांचे पगार काढण्याचे काम करतात
मुंबई नगरी टीम
कर्जत : या सरकारला कसलेच गांभीर्य नाही केवळ कॅबिनेट मंत्र्यांचे पगार काढण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री करतात, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांनी कर्जत येथील जाहीर सभेत केली.
आज शिवस्वराज्य यात्रेच्या चौथ्या टप्प्याला कर्जत येथून सुरूवात झाली.आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकला पाहिजे असे आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी सभेत केले.कर्जत येथील विकासासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने कायम प्रामाणिकपणे कामे केली आहेत असेही तटकरे म्हणाले.कर्जत-खोपोली रेल्वे दुहेरी ट्रॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे कामे पूर्ण व्हावीत म्हणून कार्यकर्त्यांना उपोषण करावे लागत आहे असेही तटकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंना बेरोजगारमुक्त महाराष्ट्र करायचा आहे मग मागील पाच वर्ष उद्योगखातं शिवसेनेकडं होतं शिवाय पर्यावरण मुक्तीसाठीदेखील पर्यावरण खातं होतं मग नेमकं कोणाला मुक्त करायचं आहे असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांना लगावला.शिवसेनेने पाच वर्षात राज्याच्या जनतेसाठी केलेली ठळक पंधरा कामे सांगा असे आव्हानही डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.आज यात्रेतून केवळ मला मुख्यमंत्री करा यासाठी मागणी केली जाते तेव्हा ती जनतेची यात्रा राहत नाही तर ती स्वार्थाची जत्रा असते. यापेक्षा रयतेचं मन राखणारी आणि रयतेचं राज्य आणणारी शिवस्वराज्य यात्रा आहे असेही अमोल कोल्हे म्हणाले.या सत्ताधाऱ्यांना कर्जमाफीचा प्रश्न विचारता पंतप्रधान भारत माता की जय चा नारा देतात आणि मग जनता विचारलेला प्रश्न विसरुन जाते. कर्जाचा डोंगर तसाच राहिला. एवढं या जनतेला गृहित धरण्याचे काम या सरकारकडून होतं असेही कोल्हे यांनी सांगितले.
जेव्हा चांगलं काम होतं तेव्हा भाजपावाले म्हणतात भाजपा सरकार. वाईट काम झाल कि शिवसेनावाले सांगतात भाजपा सरकार. आणि जेव्हा फायद्याची वेळ येते तेव्हा घाईघाईने सांगतात आमचे युती सरकार असं वेडं बनवण्याचे काम पाच वर्ष करत आहे असा आरोपही त्यांनी केला.