राज्य सरकारची कर्जमाफी योजना फ्लॉप : सचिन सावंत

राज्य सरकारची कर्जमाफी योजना फ्लॉप : सचिन सावंत

मुंबई नगरी टीम

मुंबई :   ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा भाजप शिवसेना सरकारचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून या कर्जमाफीतून ५० टक्के शेतकरी वंचित राहिल्याने शेतक-यांना न्याय देण्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. अशी प्रखर टीका  काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

गांधीभवन येथे पत्रकारांना संबोधित करताना सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतक-यांचा प्रचंड पुळका आल्याचे दाखवून कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली, त्याला आता २७ महिने झाले आहेत. ही योजना देशातील सर्वात मोठी कर्जमाफीची योजना असेल असे मुख्यमंत्र्यांनी फार गाजावाजा करीत जाहीर केले होते. परंतु सातत्याने कमीत कमी शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळेल हाच या सरकारचा कटाक्ष राहिला आहे. या योजनेची अंतिम आकडेवारी समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून लाखो शेतकरी वगळले गेले आहेत, असे दिलेले इशारे योग्य होते हे सिद्ध झाले आहे.३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत एकूण ४४ लाख ४ हजार १४७ शेतक-यांच्या खात्यामध्ये १८ हजार ७६१ कोटी ५५ लक्ष रूपये जमा करण्यात आले आहेत. याचाच अर्थ जवळपास ४५ लाख शेतक-यांना अजूनही लाभापासून वंतिच ठेवण्यात आले असून कर्जमाफीच्या रकमेचा आकडाही ५० टक्क्यांच्या आसपासच आहे.

याचबरोबर एकवेळ समझोता योजना ही धूळफेक असल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोपही सत्य ठरला आहे. या योजनेत केवळ ४ लाख २६ हजार ५८८ शेतक-यांना २ हजार ६२९ कोटी रूपये देण्यात आले आहेत. यामध्येही जवळपास ६ लाख पात्र शेतक-यांना या योजनेचा लाभच मिळाला नाही. शासनातर्फे १० लाख ४४ हजार २७९ शेतक-यांना ७ हजार २९० कोटी देण्यात येतील असे निर्धारीत करण्यात आले होते.आश्चर्याची बाब म्हणजे शासनाने अधिकृत पात्र शेतक-यांची ग्रीन लिस्ट जाहीर केली, त्यात एकूण कर्जमाफी ही ५५ लाख ६० हजार ८१६ शेतक-यांकरिता २६ हजार ४५६ कोटी ६९ लक्ष रूपयांची होती. या यादीचा अर्थ हा की अधिकृतपणे ८९ लाखांपैकी जवळपास ३४ लाख शेतक-यांना कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे.  व आतापर्यंत केवळ ४४ लाख ४ हजार १४७ शेतक-यांच्या खात्यामध्ये १८ हजार ७६१ कोटी ५५ लक्ष रूपये जमा झाल्याने ११ लाख शेतक-यांना अधिकृत पात्र घोषीत करूनही जवळपास ८ हजार कोटींची कर्जमाफी मिळालेली नाही हे स्पष्ट झाले आहे. हे शासनाच्या निरस व असंवेदनशील प्रवृत्तीचे निदर्शक आहे. जवळपास २७ महिने कर्जमाफीचे घोंगडे भिजत ठेवून प्रसंगी बँकांना घोटाळेबाज ठरवून वेगवेगळी कारणे दाखवून कमीत कमी शेतक-यांना लाभ मिळेल हे सरकारने पाहिले आहे. बँकांच्या घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेकडे तक्रारही केली नाही. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कर्जमाफीच्या रूपात शेतक-यांची घोर फसवणूक या सरकारने केली असून काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर सरसकट कर्जमाफी करेल असे सावंत म्हणाले.

Previous articleनाठाळ बैलांना मतदानाच्या दिवशी बाजार दाखवा : शरद पवार
Next articleफ्लॉप प्रवक्त्यांचे फ्लॉप आरोप : केशव उपाध्ये