राज्यात शांततेत, पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरीत्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज येथे दिली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सिंह यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत राज्यातील तयारीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात एकाच टप्प्यात २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. ४ ऑक्टोबर ही उमेदवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ५ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २४ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होईल असे सिंह यांनी सांगितले.राज्यात ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष मतदार, ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ महिला तर २ हजार ५९३ तृतीयपंथी असे एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. अद्यापही ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. त्यामुळे ज्यांची नावे अद्याप यादीत नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावे, असे आवाहन सिंह यांनी केले.
सिंह म्हणाले, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ९१ हजार ३२९ मतदान केंद्रे होती. यंदा यामध्ये ५३२५ मतदान केंद्रांची वाढ होऊन एकूण ९६ हजार ६५४ मतदान केंद्रे असतील. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना सोयीचे व्हावे, यासाठी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पाच पेक्षा जास्त मतदान केंद्रे खालच्या मजल्यावर आणण्यात आली आहेत. तसेच मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था, व्हिल चेअर आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा देण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात १.८० लाख बॅलेट युनिट, १.३० लाख कंट्रोल युनिट आणि १.३५ लाख व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत राज्यात ५०.६७ टक्के तर २०१४ च्या निवडणुकीत ६०.३२ टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६.५० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत असून या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही सिंह यांनी सांगितले.
निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी आवाहन, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची (इव्हीएम) सुरक्षितता आदींबद्दल मतदारांना माहिती देण्यात येत आहे. इव्हिएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर पूर्ण राज्यात प्रथम होणार असल्यामुळे मतदारांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशिनवर यासंबंधीची माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत ९ लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला असून त्यापैकी ६.३० लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली आहे.