राणेंचं ठरलं… १५ ऑक्टोबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार
मुंबई नगरी टीम
सिंधुदुर्ग : नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष येत्या १५ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये विलीन करण्यात येणार असल्याची घोषणा खा. नारायण राणे आज केली आहे.
नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कणकवलीमधून भाजपकडून निवडणूक लढवित आहेत. विधानसभा निवडणूकीची घोषणा होण्यापूर्वी भाजपात राज्यातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला मात्र, नारायण राणे यांचा भाजप प्रवेश निश्चित होत नव्हता. राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर आज नारायण राणे यांनी आपल्या भाजप प्रवेशाची आणि पक्ष विलीन करण्याची तारीख जाहीर केली आहे.नारायण राणे भाजपचे सहयोगी खासदार असले तरी त्यांचा अद्याप भाजपा प्रवेश झालेला नाही. राणेंचा भाजप प्रवेश आणि त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष येत्या १५ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये विलीन करण्यात येणार आहे. कुडाळ मध्ये शिवसेनेचे वैभव नाईक आणि नारायण राणे यांचे निकटवर्ती रणजित देसाई यांच्यात लढत होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात राजन तेली यांनी शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्यात लढत होत आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध सेना आमने-सामने आहेत.