४ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ९० हजार मतदारांची नव्याने नोंदणी
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात ४ ऑक्टोबर पर्यंत नव्याने ४ लाख ९० हजार ५० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० अशी झाली आहे.
राज्यात पनवेल मतदारसंघात सर्वाधिक जास्त म्हणजेच ५ लाख ५७ हजार ५०७ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २ लाख ९८ हजार ७१९ आहे तर महिला मतदारांची संख्या २ लाख ५८ हजार ६०५ इतकी आहे. सर्व्हिस मतदार म्हणून १७३ पुरुष आणि १० महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण ५७६ नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण ५ लाख ५८ हजार ८३ मतदार आहेत.
राज्यात वडाळा मतदारसंघात सर्वाधिक कमी म्हणजेच २ लाख ३ हजार ७७६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ६ हजार २१९ आहे तर महिला मतदारांची संख्या ९७ हजार ५१५ इतकी आहे. सर्व्हिस मतदार म्हणून ४० पुरुष आणि २ महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण २२४ नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण २ लाख ४ हजार इतके मतदार आहेत