विद्यमान आमदारासह भाजपच्या सहा नेत्यांची हकालपट्टी
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या भाजपाच्या एका आमदारासह सहा नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, कालच चार भाजप नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.आज सहा नेत्यांची हकालपट्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
कॅांग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले भाजपचे उमेदवार गोपाळदास अग्रवाल यांच्या विरोधात गोंदियामध्ये बंडखोरी केलेले विनोद अग्रवाल, दक्षिण नागपूर मध्ये मोहन मते या भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात दंड थोपटलेले सतीश होले,मेळघाट मतदार संघात भाजपचे अधिकृत उमेदवार रमेश मावसकर यांच्या विरोधात बंडखोरी केलेले अशोक केदार,गडचिरोलीत विद्यमान आमदार डॅा. देवराव होळीच्या विरोधात बंडखोरी केलेले गुलाब मडावी,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी अमरावती दर्यापुर मतदार संघातुन बंडखोरी केल्याने त्यांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे.अर्णी मतदार संघात संदीप धुर्वेंच्या विरोधात बंडखोरी केलेले विद्यमान आमदार राजू तोडसाम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकास भाजप- सेना महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणा-यांना मागे घेण्याचे आवाहन केले होते जर त्यांनी तसे जाहीर केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल व निवडणूकीत त्य़ांचा पराभव केला जाईल असा इशारा दिला होता. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.त्यानंतर आज पाटील यांनी हे कारवाईचे पाऊल उचलले आहे.