पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात ९ सभा घेणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात नऊ प्रचारसभा होणार असल्याची माहिती आज केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र नोंदी यांची राज्यातील पहिली प्रचारसभा १३ ऑक्टोबरला जळगाव येथे होणार आहे. दुसरी त्याच दिवशी साकोली (जि. भंडारा) येथे होईल.१६ ऑक्टोबर रोजी अकोला, ऐरोली (नवी मुंबई) आणि परतूर येथे तर १७ ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, परळी येथे सभा होणार आहेत. १८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील सभेने पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार दौऱ्याची सांगता होईल असे स्मृती इराणी म्हणाल्या. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी साडेसात हजार कोटी एवढी नुकसानभरपाई मिळाली. फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना २१ हजार ९५० कोटी एवढी भरपाई पीक विम्यापोटी मिळाली. तसेच शेतकऱ्यांना २५ हजार कोटींची कर्जमाफी दिली. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात दीड लाख कोटी एवढी गुंतवणूक करण्यात आली . मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत एकही दंगल झाली नाही. एकहीदहशतवादी हल्ला झाला नाही.फडणवीस सरकारच्या काळात जनतेने सुखी, समृद्ध आणि सुरक्षित व समृद्ध महाराष्ट्र अनुभवता आला असेही त्या म्हणाल्या.