आमचे पैलवान तेल लावून तयार परंतु कुस्ती पैलवानांशी होते इतरांशी नाही

आमचे पैलवान तेल लावून तयार परंतु कुस्ती पैलवानांशी होते इतरांशी नाही

मुंबई ‌नगरी टीम

सोलापुर : आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवानाशी होते इतरांशी नाही हे मुख्यमंत्री विसरलेत अशा शब्दात राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विरोधक नसल्याने निवडणूकाच होत नाहीत असे वक्तव्य केले होते त्याचा समाचार आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शी येथील जाहीर सभेत घेतला.जर इथे काही निवडणुकाच नाहीत तर मग देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.देशाचे गृहमंत्री म्हणतात शरद पवार यांनी ५० वर्षात काय केले ? त्यांना एकच प्रश्न करतो की, तुमच्यातील एक मायचा लाल दाखवून द्या जो सलग १४ वेळा निवडणूक जिंकला असेल असे जाहीर आव्हान शरद पवार यांनी अमित शहा यांना दिले.

राज्याच्या राजकारणात बदल करण्याची गरज आहे. यासाठी मी लोकांशी संपर्क साधतो आहे. काही लोक विकासाचे नाव सांगून आपल्याला सोडून गेले. त्यामुळे पळपुटे राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय बार्शीकर शांत बसणार नाही असेही पवार म्हणाले.हे शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करून सत्तेत आले. सत्तेत आल्यावर अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बांधण्याचे आश्वासन खोटं ठरलं. इतक्यावरच थांबले नाही तर महाराजांची परंपरा जपणारे गडकिल्ले पर्यटनासाठी खुले केले हिच किल्ल्यांची प्रतिष्ठा तुम्ही करता का? असा सवाल करतानाच इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याचे जाहीर केले मात्र तेही पूर्ण केलेलं नाही असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले. हे म्हणजे नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. यांनी कर्जमाफी दिल्याचा पत्ता नाही म्हणूनच राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्री शेतकरी समाजाला लहान पोरटोर समजू लागले आहेत. फक्त मोठा आकडा दाखवून शेतकरी समाजाला फसवण्याचं काम केलं आहे असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.आम्ही सत्तेत असताना शेकडो कारखाने काढले यातून लाखो हाताला रोजगार मिळाला.मात्र आजचे सत्ताधारी कारखाने बंद करण्याच्या भूमिका घेत आहे. लाखो तरुणांनी यातून आपला रोजगार गमावला. अनेक संसार उध्वस्त झाले आहेत याची आठवण त्यांनी सरकारला करुन दिली.

आज गृहमंत्री राज्यात येवून केवळ ३७० चा नारा देत आहेत आणि मला विचारतात ३७० वरील तुमचं उत्तर द्या. हो तुम्ही हे कलम रद्द केलं याचा आनंद आहे पण त्यापुढे ३७१ कलम देखील आहे त्यावर का कारवाई करत नाहीत. आज इथल्या पाण्याच्या, रोजगाराच्या, शिक्षणाच्या समस्यांवर बोलण्याऐवजी केवळ ३७० हाच मुद्दा अमित शहा उचलून का धरतात असा सवालही पवार यांनी केला. शरद पवार यांनी यावेळी शिवसेनेच्या वचननाम्याचाही समाचार घेतला.आता ऐकायला येतंय की, १० रुपयात जेवणाची थाळी मिळेल. राज्यात कुठे आणि किती ठिकाणी ही थाळी देणार. तुम्हाला राज्य करायला सांगतोय की, स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

Previous articleदहा रुपयात थाळी तर एक रुपयात आरोग्य चाचणी
Next articleपंकजा मुंडे यांना संभाजी सेनेचा बिनशर्त पाठिंबा !