शेतक-यांच्या आत्महत्या हे भाजपच्या हातात सत्ता असल्याचे परिणाम

शेतक-यांच्या आत्महत्या हे भाजपच्या हातात सत्ता असल्याचे परिणाम

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद  : विदर्भातील एक शेतकरी मुख्यमंत्र्यांचे स्वागत जीव देवून करत आहे. आज भाजपच्या हातात सत्ता असल्याचे हे परिणाम भोगावे लागत आहेत असे सांगतानाच हे चित्र बदलायला हवे की नको असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वैजापूरच्या जाहीर सभेत केला.

बुलढाणा जिल्हयातील शेगाव येथे एका तरुण शेतक-याने मुख्यमंत्री बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. हा धागा पकडत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.शेतकरी पिकवतात त्याची किंमत त्यांना मिळत नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक वाया गेले. आजचे मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना भाजपाची सत्ता आल्यावर कापसाला ७ हजार रुपये भाव देतो असे सांगत होते. सत्ता आली परंतु पाच वर्षांत कापसाला ७ हजार नव्हे ५ हजार रुपयेही भाव दिला नाही. एका बाजूला पिकाचे नुकसान दुस-या बाजूला विहिर गेली म्हणून नुकसान, तिस-या बाजुने किंमत मिळत नाही म्हणून नुकसान.या सगळ्या गोष्टीने त्रासलेला शेतकरी आत्महत्या करत आहे असेही  पवार म्हणाले.

बुलढाणा येथील शेगाव मधील एका तरुण शेतक-याने मुख्यमंत्री बुलढाणा जिल्हयात आले त्यावेळी आपली जीवनयात्रा संपवली. त्या तरुण शेतकऱ्याने भाजपाचे टी शर्ट घातले होते त्यावर ‘पुन्हा एकदा आपलं सरकार’ असे लिहिलेले होते म्हणजे या सरकारमुळे हे घडतंय हे त्या शेतकऱ्याने स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

आज शेतकरी कर्जबाजारी झाला आहे असून त्याला कर्जाच्या बाहेर काढायचे की नाही. आमच्या हातात सत्ता होती त्यावेळी कर्जबाजारी हा एक रोग आहे हे आम्हाला कळंल लगेच दिल्लीत बसून एका महिन्याच्या आत देशातील शेतक-यांचे ७१ हजार कोटीचे कर्ज माफ केले आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरील ओझं कमी केले. आज काय चित्र आहे  ऑनलाइन कर्ज माफी देतो असे जाहीर केले.. अहो कशाचे ऑनलाईन आणि कशाचे ऑफलाईन… काही कर्जमाफी केली नाही अशी  टीकाही पवार यांनी केली.आज कर्जमाफी करायची गरज आहे. व्याजाचे दर कमी करायची गरज आहे. मी मुख्यमंत्री असताना व्याजाचे दर कमी केले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाला १२ टक्क्यावरुन ८ आणि ८ वरुन ६ टक्क्यावर आणले. आणि नंतर ३ वर आणले. नंतर ३ लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज शेतकरी घेत असतील आणि वेळेत परत करत असतील तर त्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय घेतला. मात्र यापुर्वी आणि आताही कुणी घेतला नाही. त्यामुळे अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची का असा सवालही  पवार यांनी केला.

वैजापूर तालुका म्हटले की दुष्काळ असलेला भाग समोर येतो. यासाठी आजच्या सत्ताधाऱ्यांनी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. मी राज्याच्या विधानसभेत जरी नसलो तरी तिथे काय चालते याची माहिती घेत असतो. आपल्या भागातील पाण्याच्या प्रश्नावर भाऊसाहेब चिकटगावकरांनी विधानसभेत मागणी केली नाही असा कधी घडलेच नाही. त्यामुळे आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी सततची भूमिका ज्यांनी घेतली ते राहिलेलं काम पुढे पूर्ण करण्यासाठी नव्या दमाचा, प्रश्न सोडवण्याची कुवत असलेला भरभक्कम असा प्रतिनिधी आमदार म्हणून निवडला पाहिजे त्यासाठीच अभय चिकटगावकरांची निवड पक्षाने केली आहे असेही पवार म्हणाले.१९६८ साली मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. त्यावेळी पक्षाकडे तिकीट मागितले. त्यावेळी माझ्यासोबत ११ जणांनी तिकीटाची मागणी केली. पण माझे भाग्य होते आणि माझ्या पहिल्या निवडणुकीच्यापाठी वैजापुराच्या विनायक पाटील यांच्या नेतृत्वाचा हात होता याची आठवण  पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितली.आपल्या तालुक्यात पाण्याची परिस्थिती बिकट आहे. आपल्या भागात कांदा, मका, कापूस असे पीक घेतले जाते. यात दोन पैसे मिळण्याची अपेक्षा आहे परंतु आजचे सरकार हे होऊ देत नाही असा आरोपही पवार यांनी केला.

Previous articleभाजपच्या ८ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी
Next articleमागाठाणेत शिवसेनेपुढे मनसेचे तगडे आव्हान