निकालाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री केदारनाथांच्या चरणी
मुंबई नगरी टीम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी केदारनाथचे दर्शन घेतले होते. त्यांच्यांच पाऊलावर पाऊल ठेवत विधानसभा निवडणूकीच्या निकालाच्या एक दिवस आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केदारनाथचे दर्शन घेतले आहे.
सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालापूर्वी एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथचे दर्शन घेतले होते. एका गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली होती.मोदींच्या या दौऱ्याची आठवण यावी, असाच प्रसंग आज घडला आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथचे दर्शन घेवून, तेथे धार्मिक विधी पूर्ण केले.यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.केदारनाथांच्या दर्शनानंतर त्यांनी याची माहिती फोटोसह ट्विट करून दिली आहे. आज सकाळी केदारनाथाचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले. हर हर महादेव असे ट्विट त्यांनी केले आहे.उद्या गुरूवारी सकाळी ८ वाजल्यापासुन मतमोजणीला सुरूवात होणार असून,दुपारपर्यंत राज्यातील चित्र स्पष्ट होईल.विविध वृत्त वाहिन्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येईल असे चित्र आहे.