निम्म्या निम्म्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्री ठरवू : उद्धव ठाकरे
मुंबई नगरी टीम
मुंबई :विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होत असतानाच मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपामध्ये झुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी निम्म्या निम्म्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्री ठरवू असे स्पष्ट केल्याने युती मध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विधानसभेसाठी ठरलेल्या फॉर्म्युलावर चर्चा करुन निर्णय घेऊन मग सरकार स्थापनेचा दावा करु अशी माहिती देत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपाला इशारा दिला आहे.
जेव्हा राजकर्त्यांचे डोळे बंद होतात, तेव्हा जनता डोळे उघडते. नुसतेच डोळे उघडत नाही, तर डोळ्यांत चांगले अंजन घालते. आताही आम्ही डोळे चोळत मुख्यमंत्री पदासाठी एकमेकांशी भांडत राहिलो, तर जनता पुन्हा आमच्या डोळ्यांत अंजन घालेल. हाच महाराष्ट्र मला अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमचा जो फॉर्मुला ठरला आहे, त्यानुसार अत्यंत पारदर्शक शासन घेऊन जनतेपुढे येऊ, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट केले.लोकसभा निडणुकीच्या वेळी युती झाली तेव्हा ५०-५० टक्केचा फॉमुर्ला ठरला होता. त्या वेळी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १४४ जागा लढण्याचे ठरवले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या अडचणी सांगितल्यावर आम्ही अल्प जागा स्वीकारल्या; मात्र त्यांच्या अडचणींत वाढ होणार असेल, तर सर्वच अडचणी आम्हाला समजून घेता येणार नाहीत.जनतेने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयाने जनतेने सत्ताधार्यांचे पाय जमिनीवर ठेवले आहेत. मला सत्तेची हाव नाही. सत्तेसाठी काहीही स्वीकारणे, हे माझा रक्तात नाही. आम्हाला सत्ता स्थापन करायची घाई नाही. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्र येऊन याविषयी सविस्तर चर्चा करून पारदर्शकपणे निर्णय घेऊ आणि महाराष्ट्राला मजबूत शासन देऊ असे ठाकरे म्हणाले.
















