शिवसेनेकडून सरकार स्थापनेसंदर्भात प्रस्ताव आल्यास काँग्रेस हा निर्णय घेणार !
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असतानाच काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करून एकच खळबळ उडवून दिली आहे.शिवसेनेकडून सरकार स्थापनेसंदर्भात कोणताही प्रस्ताव आम्हाला मिळाला नाही मात्र त्यांचा अधिकृत प्रस्ताव आला तर त्याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज दिली.
विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर राज्यात पुन्हा भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झाले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे कालच म्हटले आहे. राज्यात 20 अपक्ष आमदार निवडून आले आहेत हे अपक्ष आपल्या संपर्कात असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दबाबतंत्र सुरू केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी निम्म्या निम्म्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्री ठरवू असे जाहीर केल्याने सत्तासंघर्ष तीव्र झाला असतानाच आता यामध्ये काँग्रेसने उडी घेतली आहे. शिवसेनेने सरकार स्थापनेसंदर्भात अधिकृत प्रस्ताव दिल्यास पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जनमत भाजपाविरोधी आहे हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच,जनमताचा कौल आम्हाला मान्य असून आम्ही विरोधीपक्ष म्हणून जनतेची सेवा करण्यचा पूर्ण प्रयत्न करू असे देखील त्यांनी सांगितले. आगामी पाच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीसह आमच्या मित्रपक्षांचा एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करण्याचा प्रयत्न राहील. या निवडणुकीत जनमताचा जो कौल आहे, तो सत्तेच्या विरोधी आहे असे आमचे मत आहे. या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा सरकारच्या विरोधात असल्याचे स्पष्ट दिसते असेही थोरात म्हणाले.
राज्यातील जनतेने दिलेला जनमतानुसार भाजपचा सत्तेचा अहंकार उतरवला आहे.भाजपच्या नेत्यांना जनतेने जमिनीवर आणल्याने त्यांना आता विरोधकही दिसतील असा टोला थोरात यांनी लगावला. भाजपने सत्ता पैसा आणि यंत्रणाचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्षांतर करायला लावले पण जनतेने या सर्व आयाराम गयारामांचा पराभव करून भाजपच्या सत्तेच्या मग्रुरीला चाप लावला आहे अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरू नका, ऊत मात करू नका हा संदेश जनतेने या निकालातून दिला आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभरात जोरदार प्रचार केला, त्यांच्या अनुभवाचा आम्हालाही फायदा झाला. मुंबईसह शहरी भागात अपेक्षित यश मिळाले नाही. तिथे आम्ही जास्त प्रयत्न करू, संघटन मजबूत करू, पाच वर्षात नवी काँग्रेस उभी करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.