पुन्हा देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री !
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आहे.शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार दिले असतानात आता भाजपाच्या विधीमंडळ नेत्याची निवड येत्या ३० ऑक्टोबरला करण्याच येणार आहे.महाजनादेश यात्रा आणि विधानसभा निवडणुक प्रचाराची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार पडली. निवडणुक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील अशी घोषणा केल्याने भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेपाठोपाठ आता भाजपानेही सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या नवनिर्वाचित १०५ आमदारांची बैठक येत्या ३० ऑक्टोबर रोजी विधानमंडळातील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधीमंडळ नेता निवडीवर चर्चा होणार असून, विधीमंडळ नेतेपदी कोण असावे यावर निर्णय घेतला जाणार आहे. निरिक्षक म्हणून केंद्रातील नेते उपस्थित राहणार आहेत यावर मंथन केले जाणार आहे.भाजपने १०५ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे आहे.भाजपला सत्ता स्थापनेसाठी अजूनही ४० जागांची गरज आहे. त्यापूर्वी येत्या ३० ऑक्टोबरला भाजपच्या विधीमंडळ नेत्याची निवड होणार आहे.विधानभवनात होणा-या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच निवड होणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध आणि दिल्लीश्वरांच्या आशिर्वादामुळे मुंख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील अशी चर्चा आहे.