शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देणार ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील शिवसेना भाजपातील संत्तासंघर्ष टोकाला पोहचला असून, भाजपाने शपथविधीच्या हालचाली सुरू केल्या असतनाच आता शिवसेना राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात शिवसेनेने सरकार स्थापन केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकींचा निकाल लागून आठवडा उलटून गेला असला तरी राज्यात अजून सरकार स्थापनेचा दावा कोणत्याच पक्षाने केला नसल्याने शिवसेना भाजपातील सत्तासंघर्ष टोकाला गेल्याचे चित्र आहे.तर दुसरीकडे राज्यात भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता वाढली आहे.दुसरीकडे भाजपानेही शिवसेनेला रोखण्यासाठी राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात करून स्वबळावर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत.येत्या ५ नोव्हेंबर रोजी शपथविधी उरकण्याची तयारी भाजपाच्या गोटात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भाजपाच्या या खेळीवर मात करण्यासाठी आता शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे तर आज राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली मात्र या भेटीतील निर्णयाबाबत त्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिल्याने राजकीय पेचाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यात भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपा असला तरी भाजपाला शिवसेनेच्या मदती शिवाय सरकार स्थापन करता येवू शकत नाही. गेल्या वेळेप्रमाणे भाजपाने सरकार स्थापन केले तरी संख्याबळानुसार भाजपाचे सरकार टिकू शकत नाही. गेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यामुळे आवाजी मतदानावर राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले होते. मात्र सध्याच्या संख्याबळावरून शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना बाहेरून पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.सध्या भाजपाचे १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेसचे संख्याबळ हे ४४ आहे. प्रहार, सपाचे आणि एमआयएमचे प्रत्येकी २ सदस्य तर बविआ ३,शेकाप,जनसुराज्य,सीपीएम, क्रांतीकारी, स्वाभिमानी मनसे आणि रासप यांचे प्रत्येकी १ सदस्य आणि १३ अपक्ष सदस्य निवडुन आले आहेत.