फक्त शिवसेनेचा नाही तर महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी व्हावा

फक्त शिवसेनेचा नाही तर महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी व्हावा

मुंबई नगरी टीम

मुंबई : फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी शिवाजीपार्कवर होईल असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी करू नये. शिवाजीपार्कवर शपथविधी केवळ शिवसेनेचा नाही तर भाजपसह शिवसेना आरपीआय महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी व्हावा आणि त्यांनी मुख्यमंत्रापदाचा आग्रह सोडावा.काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दुराग्रह संजय राऊत यांनी सोडावा त्यांनी हे लक्ष्यात घ्यावे की  त्यांच्यापेक्षा अधिक जवळचे संबंध माझे  शरद पवारांशी आहेत. त्यामुळे लवकरच मी शरद पवार यांची भेट घेणार आहे असे वक्तव्य केंद्रियराज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले आहे.

शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडावा; शिवसेनेने  उपमुख्यमंत्रीपद  आणि १६ मंत्रीपदांचा भाजपचा  प्रस्ताव स्वीकारावा;  त्यात आणखी दोन मंत्रीपदे शिवसेनेला वाढवून द्यावीत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लवकर महायुतीच्या सरकारचा शपथविधी कसा होईल तशी भूमिका घेण्याचा सल्ला दिला. जनतेने भाजप शिवसेनेला बहुमताचा जनादेश दिला आहे. त्या विपरीत भूमिका शिवसेनेने घेऊ नये. शरद पवारांचा पाठिंबा फक्त संजय राऊत मिळवू शकतात असे नाही माझे शरद पवारांशी अधिक जवळचे संबंध आहेत. भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असे सत्तावाटप करून महाराष्ट्राच्या हितासाठी लवकर सरकार स्थापन करावे ही माझी भूमिका आहे. पण वेळ पडल्यास आपण लवकर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

Previous articleपक्ष सोडून गेलेले आज माघारी येऊ का म्हणायला लागलेत : अजित पवार
Next articleशिवसेना नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट