राज्यातील सत्तेचा तिढा कायम
मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आज होणा-या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या भेटीनंतर राज्यातील सत्तापेच सुटेल अशी आशा असतानाच आता राज्यातील सत्तेचा तिढा अजून वाढल्याचे चित्र आहे.आज झालेल्या बैठकीत राज्यातील सत्तापेचावर चर्चा करण्यात आली.मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात सोनिया गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केल्याने राज्यातील सत्तापेच कायम राहण्याची शक्यता वाढली आहे.
राज्यात कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करण्यात यश न आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. या दरम्यान राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात आज बैठक होणार होती. या बैठकीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते.आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.सुमारे ४५ मिनिटे झालेल्या या बैठकीत राज्यातील सत्तापेचावर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी ए के अँटोनी या बैठकीत उपस्थित होते.या भेटीनंतर नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी भेटीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती पत्रकारांना दिली.आजच्या भेटीत सरकार स्थापनेबाबत सोनिया गांधीशी कोणतीही चर्चा झाली नाही,आघाडीत शेकाप,समाजवादी पार्टी,स्वाभिमानी शेतकरी पक्ष, कवाडे गट या मित्र पक्षांना नाराज करु चालणार नाही, त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.आम्ही राज्यातील परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहोत असे पवार यांनी यावेळी सांगितले.राज्यातील सत्ता संघर्षावेळी राज्यात काँग्रेसचे नेते आले होते.त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी समन्वय समितीमध्ये किमान समान कार्यक्रम ठरविला जाईल असे सांगितले होते.त्यानुसार राज्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यामध्ये बैठक होवून किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा झाली. मात्र असे काहीच घडले नसल्याचे पवार यांनी आज सांगितले.
दरम्यान नवी दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची दोन दिवस बैठक होणार आहे. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीत पाचारण करण्यात आले. त्यानुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण दिल्लीला रवाना झाले आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सुद्धा दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहे.दिल्लीत होणा-या राष्ट्रवादीच्य़ा नेत्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे.ही बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे.त्यांनतरच राज्यातील सत्तापेचावरील गुढ उकलले जाणार आहे.तर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.शरद पवार यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात पुढे काय करायचे याचा निर्णय होईल असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.