राज्यात लवकरच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे स्थिर सरकार
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील सत्तापेच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासंदर्भात आज दिल्लीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची सुमारे तीन तास बैठक झाली. सत्तास्थापने संदर्भात अजून दोन ते तीन दिवस दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा करण्यात येवून, महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार अस्तित्वात येईल असे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी स्पष्ट केल्याने राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार स्थापन होण्याची आशा निर्माण झाली आहे.
गेली २१ दिवस सुरु असलेला राज्यातील सत्ता पेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आज महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची तब्बल तीन तास बैठक झाली.या बैठकीत शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबरोबरच नव्या सरकारचा किमान समान कोणता असावा यावर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते.यि बैठकीनंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही राज्यात गेली २१ दिवस अस्थिरता सुरू आहे. राज्यातील अस्थिरता संपवण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आज प्रदीर्घ चर्चा केली. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा अत्यंत सकारात्मक झाली आहे. अजून दोन ही चर्चा सुरू राहणार आहे. सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात असल्याने महाराष्ट्रात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन होईल, असा विश्र्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनीही राज्यात पर्यायी सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून प्रशासन ठप्प आहे. नुकसानग्रस्त शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे राज्यात नवे सरकार याव ही सर्वांचीच इच्छा असल्याने आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे. असे मलिक म्हणाले.
दरम्यान सरकारस्थापनेबाबत लवकरच गोड बातमी मिळेल, पेढ्यांची ऑर्डर गेली असे समजा अशा शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला. राज्यात राष्ट्रपती राजवट दूर होऊन लवकरच सरकार स्थापन होईल, सर्व घडामोडींवर शिवसेनेची नजर असून सरकार स्थापनेबाबतची गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार गोड बातमी देऊ शकले नाहीत मात्र शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच गोड बातमी देतील असेही राऊत म्हणाले.