काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व मुद्द्यांवर एकमत
मुंबई नगरी टीम
मुंबई : नवी दिल्लीत सुरू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधिल चर्चांचे सत्र संपले असून,आज नवी दिल्लीत झालेल्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यात येवून सर्व मुद्द्यावर एकमत झाले असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी प्रवक्ते आमदार नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.
राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात गेली दोन दिवस नवी दिल्लीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र आज संपले आहे. आज झालेल्या बैठकीत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यात येवून,या मुद्द्यावर एकमत झाले असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.चव्हाण यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक उपस्थित होते.राज्यात दोन्ही काँग्रेसची शेकाप,समाजवादी पार्टी, कवाडे गट,या मित्र पक्षाशी आघाडी असल्याने काँग्रेसचे नेते या घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना माहिती देणार आहेत.मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.नव्या सरकारचे मंत्रिमंडळ, सत्ता वाटप कसे असेल याची माहिती उद्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल असेही चव्हाण म्हणाले.आज नवी दिल्लीत झालेल्या या घडामोडीनंतर आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.