उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील सत्तापेचावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली असून,विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे असावे यावर दोन्ही काँग्रेसमध्ये सहमती झाली नसल्याने उद्या पुन्हा दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा होणार असून, त्यानंतर सरकार स्थापनेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार असला तरी आज शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यावर सहमती झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीनंतर दिली आहे.
राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासूनशिवसेना काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र आजही सुरू होते.आज काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. राज्यातील सत्तापेचावर या बैठकीत आजच अंतिम फैसला होईल अशी अपेक्षा होती मात्र विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे असावे यावर दोन्ही काँग्रेसचे एकमत झाले नसल्याने उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे. मात्र आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांचे नाव पुढे आले आहे.यासाठी तिन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. नेतृत्त्व कोणी करायचे हा आमच्या समोरचा अजेंडा नाही असेही शरद पवार यांनी या बैठकीनंतर सांगितले. आजच्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी सांगितले.
पहिल्यांदाच आमच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एकत्र चर्चा झाली. आजच्या बैठकीत अनेक मुद्यावर आम्ही मार्ग काढला आहे. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. तुमच्यासमोर येऊ तेव्हा एकही मुद्दा अनुतरित्त ठेवणार नाही. सर्व प्रश्न सोडवून तुमच्यासमोर येऊ. आमची चर्चा योग्य दिशेने सुरु आहे असे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर सांगितले. तर राज्यामध्ये महाविकासआघाडीचे सरकार यावे यासाठीची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे. काही मुद्द्यांवर चर्चा बाकी असल्याने उद्याही चर्चा सुरु राहणार आहे, अशी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.