भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आज आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही असे सांगून, त्यानंतर राजयात आम्ही तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करू,असे स्पष्ट केले आहे.
राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी पक्ष सहमत नाही. अजित पवार यांच्या शपथविधी वेळी राष्ट्रवादीचे ११ आमदार असल्याची माहिती मिळाली होती.मात्र त्यापैकी काही आमदार परत आमच्याकडे आले आहेत. राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या सह्यांचे पत्र सरकारच्या पाठिंब्यासाठी नव्हते. आम्ही पक्षांतर्गत घेतलेल्या त्या सह्या होत्या. त्या राज्यपालांना सादर करून आकडा दाखवण्यात आला असावा, असा माझा अंदाज आहे, असे सांगत, राज्यपालांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
अजित पवार यांनी केलेला प्रकार हा शिस्तभंगाचा आहे. प्रामाणिक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता भाजपाबरोबर जाणार नाही. जे कोण त्यांच्यासोबत गेले त्यांना याबाबत माहिती होती. पक्षांतर्गत बंदी कायदा असल्याने जो कोणी वेगळा विचार करेल. त्यांच्याविरोधात आम्ही तिन्ही पक्ष योग्य ती भूमिका घेवू असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.जे जाणार असतील त्यांच्याविरोधात कारवाई होईल. सर्वसामान्य माणूस हे अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही. अजित पवारांसोबत १० ते १२ जण जे गेले त्यातले काही परत येत असल्याचे पवार यांनी सांगितले.
अजित पवारांनी आम्हाला फोन करून राजभवनात जायचे असा निरोप दिला.आम्हाला राजभवनात का नेले हे माहित नव्हते. सकाळी सात वाजता आम्ही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पोहचलो. ज्यावेळी राजभवनात शपथविधी सुरू झाला तेव्हा आम्हाला याची कल्पना आली. आम्हाला कोणतीही कल्पना न देता त्या ठिकाणी नेण्यात आले असल्याचे आमदार राजेंद्र शिंगणे, संदिप क्षिरसागर यांनी सांगितले .सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा आमच्याकडे होता. आमच्याकडे १७० च्या आसपास बहुमत होते.या घडामोडीनंतर राज्याच्या आम्ही सरकार स्थापन करणार असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
आमची लढाई भाजपाच्या ‘मी’पणाविरोधाच सुरूच राहणार असून, आम्ही तिन्ही पक्ष सर्व चर्चा दिवसाढवळ्या करतो, ते समोरचे लोक फोडून करतात. आम्हाला विरोधीपक्ष नको, प्रतिस्पर्धी नको असे सध्या सुरू आहे. कोणी पाठित वार करण्याचा प्रयत्न करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.