अवघ्या साडे तीन दिवसात भाजपा सरकार कोसळले; देवेद्र फडणवीसांचा राजीनामा
मुंबई नगरी टीम
मुंबई : अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने भाजपाकडे बहुमत उरलेले नसल्याने देवेद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांना सोपिवल्याने तीन दिवसापूर्वी सत्तेवर आलेले भाजपाचे सरकार कोसळले आहे.काल शिवसेनेचे नेते काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची शपथ घेत होते हे केवळ सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एकमेव कार्यक्रम तिन्ही पक्षांचा ठरला होता.नव्याने स्थापन होणारे तीन चाकाचे सरकार विरूद्ध दिशेला धावेल असे सांगून त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आज राज्यात वेगवान घडामोडी घडल्या आहेत.सभागृहात संख्याबळाअभावी बहुमत सिद्ध करू शकणार नाही याचा अंदाज आल्याने अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविल्यानंतर भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने दुपारी देवंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेवून राजीनामा राज्यपालांकडे सोपविणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जावून आपला राजीनामा राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपविला आहे.अजित पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने तीन दिवसापूर्वी सत्तेत आलेले भाजपाचे सरकार कोसळले आहे.आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनेतने महायुतीला संपूर्ण बहुमत दिले होते.तर भाजपाला जनादेश दिला होता.शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता.ज्यावेळी शिवसेनेला संख्याबळाचा अंदाज आल्याने त्यांनी बार्गिनिंगला सुरूवात केली. तुम्ही मुख्यमंत्रीपद देमार नसाल तर आम्ही कोणासोबतही जावू अशी धमकी शिवसेनेने दिली असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी यावेळी केला.जे ठरले ते देऊ जे ठरले नाही ते देणार नाही हे आम्ही शिवसेनेला सांगितले.मात्र आमच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस,राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली. जे लोक मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते ते बाहेर पडून इतरांच्या पायऱ्या झिजवत होते अशी टाकाही त्यांनी शिवसेनेवर केली.सुरूवातीला आमच्याकडे संख्याबळ नसल्याने सरकार स्थापन करण्यास नकार दिला.पुरेसे संख्याबळ नसतानाही शिवसेनेने सरकार स्थापन करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केल्याचे राज्यातील जनतेने पाहिले आहे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असतानाही तिन्ही पक्षांच्या चर्चा सुरू होत्या. हे तिन्ही पक्ष भिन्न विचारसरणीचे असल्याने ते सत्ता स्थापन करू शकले नाही. केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाचा या पक्षांचा एकमेव कार्यक्रम होता असेही फडणवीस म्हणाले.
राष्ट्रपती राजवट किती दिवस ठेवणार या कारणाने अजित पवार यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले.त्या आधारे आम्ही सरकार स्थापन केले असे फडणवीस यांनी सांगितले. आज अजित पवार यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणाने उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे पुरेसे संख्याबळ उरलेले नसल्याने आम्ही राजीनामा देण्याच निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले.शिवसेना, राष्ट्रावादी आणि काँग्रेसचे तीन चाकाचे सरकार विरूद्ध दिशेला धावणार अशी टीका करून त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला शुभेच्छा देवून यापुढे भाजपा प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.