स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक तातडीने पूर्ण करा : धनंजय मुंडेंची मागणी

स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक तातडीने पूर्ण करा : धनंजय मुंडेंची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : उद्या १२ डिसेंबर रोजी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती असून,यानिमित्ताने मागील भाजपा सरकारने केवळ निवडणुकाभिमुख केलेल्या घोषणांपैकी औरंगाबाद येथील स्व. मुंडे साहेब यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करावे तसेच उद्या मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त याबाबत घोषणा करावी अशी भावनिक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे पुतणे आ. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे हे वंचित उपेक्षितांचे नेते होते. सबंध आयुष्यात शेतकरी, कष्टकरी, दुर्बल – वंचित घटकांसाठी त्यांनी परिश्रम घेतले, कायम संघर्ष वाट्याला आलेल्या स्व. मुंडे साहेबांचे जुन २०१४ मध्ये दुर्दैवाने अपघाती निधन झाले. तत्कालीन भाजप सरकारने मुंडे साहेबांचे औरंगाबाद येथे स्मारक बांधण्याबाबत घोषणा केली, परंतु पाच वर्षात सदर स्मारकाची एक विटही लावण्यात आली नाही. स्व. मुंडे साहेबांच्या नावाने सुरू केलेल्या ऊसतोड कामगार महामंडळाचेही हाल काही वेगळे नाहीत. सदर महामंडळ केवळ घोषणेपूरते असून अनेक कामगारांची हेळसांड होत आहे. ही हेळसांड थांबवण्यासाठी ऊसतोड महामंडळाच्या उभारणीत असलेले अडथळे दूर करून सदर मंडळ तात्काळ कार्यान्वित करावे अशीही मागणी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आ. धनंजय मुंडे हे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय व वैयक्तिक आयुष्यात सावलीप्रमाणे सोबत असायचे पुढे घडलेल्या राजकीय मतमतांतरे व कौटुंबिक बिघाडानंतर धनंजय मुंडे राजकीयदृष्ट्या वेगळे झाले. परंतु पुतण्या म्हणून त्यांनी आपल्या काकांवरील प्रेम कधीही कमी होऊ दिले. स्व. मुंडे साहेबांचे स्मारक, ऊसतोड कामगार महामंडळ आदी मागण्यांसाठी मुंडे कायम आग्रही राहिलेले आहेत.

Previous articleराज्य निवडणूक आयोगाकडे २६० राजकीय पक्षांची नोंदणी
Next articleमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : महामंडळावरील नियुक्त्या रद्द ?