“गाव तिथे काँग्रेस” अभियान राबवणार :बाळासाहेब थोरात

“गाव तिथे काँग्रेस” अभियान राबवणार :बाळासाहेब थोरात

मुंबई नगरी टीम

मुंबई :राज्य़ात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘गाव तिथे काँग्रेस हे अभियान सुरु करण्यात आले असून आगामी तीन महिने चालणाऱ्या या अभियानाअंतर्गत राज्यभरात ४० हजार ग्राम काँग्रेस कमिट्यांची स्थापन केली जाणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे आज बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची, महिला काँग्रेस, एनएसयुआय, तसेच सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला प्रदेश कार्याध्यक्षा व महिला, बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुझफ्फर हुसेन, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, प्रदेश सरचिटणीस माजी आ. मोहन जोशी, ऍड.गणेश पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख आदी उपस्थित होते.

या बैठकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पदाधिका-यांशी संवाद साधला व संघटनात्मक कार्याची माहिती घेतली. गाव तिथे काँग्रेस या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ४० हजार ग्राम काँग्रेस कमिट्यांची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच बुथ काँग्रेस कमिट्यांचे पुर्नगठण करण्यात येणार आहे. या अभियानाची जबाबदारी प्रदेश आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण ताकदीने हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर वाडिया रुग्णालयाचा प्रश्न निकाली
Next articleमंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट