…तर काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सर्वांनाच भारतरत्न द्यावा लागेल
मुंबई नगरी टीम
मुंबई : वि. दा. सावरकर यांना भारतरत्न देण्याची चर्चा सुरु असून केंद्रात भाजपाचे मोठ्या बहुमताचे सरकार आहे विरोधकांची तमा न बाळगता ते सावरकरांना भारतरत्न देऊ शकतात. परंतु गेली अकरा वर्ष सत्तेत असणाऱ्या भाजपाला ते जमलेले नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा इतरही शेकडो लोकांना भोगलेली आहे.त्यांचे बलिदान, त्याग, समर्पण लक्षात घेता त्यांनाही भारतरत्न द्यावा लागेल असा टोला सावंत यांनी लगावला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सावंत म्हणाले की, सावरकर समर्थकांनाच इतिहासाची उजळणी करण्याची गरज आहे. अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे १९०९-२१ या कालावधीत १४९, तर १९२२ ते ३१ याकाळात ३० व १९३२ ते १९३८ याकाळात ३८६ लोक होते. यामध्ये योगेश शुक्लासारख्या अनेकांनी शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतला होता. माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या या सर्वांना भारतरत्न द्यावे लागेल. काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेल्या या सर्वांनी ब्रिटिशांना साथ दिली नाही. ब्रिटिशांकडून मानधनही घेतले नाही. सावरकर समर्थकांनी अंदमान जेल जाऊन नुसते पाहिले तर माफी न मागणाऱ्या व प्राणांची आहुती देणाऱ्या या अनेक महान सुपुत्रांच्या त्यागाचे महत्व कळेल. आम्हाला अंदमानात जाऊन दोन दिवस राहण्याचा सल्ला देणाऱ्यांनीच अंदमानात जावे, या शेकडो सुपुत्रांच्या त्यागाची, समपर्णाची, बलिदानाची माहिती त्यांना कळेल आणि ती त्यांनी कळणे गरजेचे आहे.
सावरकरांसंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की,१९११च्या आधीचे सावरकर वेगळे होते. १९२३ नंतरच्या सावरकरांच्या विचारांना काँग्रेसचा विरोध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माथेफिरू, बुध्दधर्मियांना राष्ट्रद्रोही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सद्गुणांना विकृती म्हणणारे तसेच त्रावणकोर स्वतंत्र केल्याचे अभिनंदन करणारे सावरकर काँग्रेसला मान्य नाहीत, त्यांच्या अशा विचारांना आमचा कायमच विरोध राहिल.महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये कधी मतभेद होतील आणि कधी सत्तेची गणितं मांडता येतील यासाठी भाजपा देव पाण्यात घालून बसला आहे परंतु हे सरकार सावरकरांचे विश्लेषण करण्यासाठी स्थापन झालेले नाही. काँग्रेसचे शिवसेनेबरोबर वैचारिक मतभेद आहेत आणि वैचारिक मतभेद असतानाही आम्ही भाजपाचे लोकशाहीविरोधी सरकार बाजूला ठेवण्यासाठी एकत्र येऊन समान किमान कार्यक्रमाच्या आधारावर हे सरकार स्थापन केलेले आहे, त्यात सावरकर हा विषय नाही, असेही सावंत म्हणाले.