विखेंना पक्ष बदलण्यासाठी सगळा महाराष्ट्र ओळखतो : बाळासाहेब थोरात
मुंबई नगरी टीम
मुंबई : आम्ही कायम काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. निष्ठा व तत्वे यामध्ये कधीही तडजोड केली नाही.त्यांना पक्ष बदलण्यासाठी सगळा महाराष्ट्र ओळखतो आहे.त्यांनी मागील साडेचार वर्षात काँग्रेसमध्ये राहून केलेले पक्षविरोधी काम हे सगळया महाराष्ट्राने पाहिले आहे.तेव्हा आता त्यांच्या वक्तत्यांना फार महत्व देण्याची गरज नाही असा टोला लगावत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही भाजपात प्रवेश करणार होते असा गौप्यस्फोट भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. बाळासाहेब थोरात कुणाकुणाला भेटले याचा तपशील माझ्याकडे आहे. आत्ता जे ते सत्तेत गेले आहेत ते फक्त नशीबाने गेले आहेत. त्यांना मंत्रिपद मिळाले तेदेखील नशीबाने मिळाले. मात्र बाळासाहेब थोरातही भाजपात प्रवेश करण्याच्या विचारात होते असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि,त्यांना पक्ष बदलण्यासाठी सगळा महाराष्ट्र ओळखतो आहे. त्यांच्या वक्तव्याला मीच काय कोणीही महत्व देत नाही आपण संकटाच्या काळात कायम काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलो. कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष सोडण्याचा विचार ही कधी मनात आला नाही.अडचणीच्या काळात काम केले आणि करत राहणार आहे. उलट मागील साडे चार वर्षांत पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासह अनेक पदे दिली. त्यांनी कसा पक्ष वाढविला, कसे पक्षविरोधी काम केले, हे सगळया जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आता ते काय बोलतील याला फार महत्व देण्याची गरज नाही. आता ते जिथे गेले आहेत तिथे त्यांनी अल्पावधीतच मित्र वाढविले आहेत. ही त्यांची जुनी कार्यपध्दती आहे. आता सत्ता नाही विरोधी पक्षात असल्यामुळे ते काहीही बोलतील. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर जास्त बोलण्याची गरज नाही.
अनेक लाटा आल्या पण काँग्रेसचा विचार हा देशाच्या विकासाचा शाश्वत असल्याने तो कायम टिकून आहे. आता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरी, सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणार आहे. कर्जमाफीच्या निर्णयामध्ये कोणत्याही किचकट अटी नसून सरसकट २ लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. नियमित कर्जफेड करणारे व २ लाखांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्य शेतकर्यांना मदत देण्याबाबत ही सरकार काम करत आहे. राज्यात जिल्हा परिषदांसाठी ही महाविकास आघाडी एकत्र काम करणार असून अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये ही महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सोशल मिडीयावर ही विखेंची खिल्ली
विखेंनी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन सोशल मिडीयात ही सर्वत्र जोरदार टिका होत असून पक्षनिष्ठा काय असते? याबाबद विखेंनी बोलावे हाच मोठा विनोद असल्याची खिल्ली उडविली जात आहे. “जिकडे सत्ता तिकडे विखे” याबाबतच्या विविध टिपण्णी पाहायला मिळत आहेत.