ज्यांना जनतेने नाकारले त्यांच्यासोबत घरोबा करण्याचे पातक शिवसेनेने केले
मुंबई नगरी टीम
शिरपूर: लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये अतिशय स्पष्ट जनादेश महाराष्ट्रातील जनतेने दिला. पण,जनमताचा अनादर करण्याचे,जनादेशाशी विश्वासघात करण्याचे आणि ज्यांना जनतेने नाकारले, त्यांच्यासोबत घरोबा करण्याचे पातक शिवसेनेने केले आहे आणि हीच त्यांच्या पतनाची सुरूवात आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या वाशीम जिल्ह्यांतील सभांमध्ये सांगितले.
जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या आजच्या चौथ्या दिवसाची सुरूवात देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील अनसिंग आणि शिरपूर येथून केली. त्यानंतर अकोला जिल्ह्यातही त्यांनी दोन सभा घेतल्या. जनता ज्यांना निवडून देते, ते सरकार चालवितात, असे आजवर आम्हाला माहिती होते. पण, शिवसेनेने नवा इतिहास घडविला. काहीही करा, पण, सत्ता मिळवा, असा हा प्रकार आहे. २०१९ मध्ये 2२निवडणुका झाल्या. लोकसभेत ४८ पैकी ४१ जागा देत जनता मोदीजींच्या पाठिशी उभी राहिली. विधानसभेत भाजपाला १०५ आणि शिवसेनेला ५६ जागा देत पुन्हा जनता मोदीजींच्या पाठिशी उभी राहिली. पण, शिवसेनेने विश्वासघात केला. जनमताचा अनादर करून, जनतेशी आणि जनादेशाशी विश्वासघात करत, जनतेने ज्यांना नाकारले त्यांच्याशी घरोबा करत, जनतेशी बेईमानी करत शिवसेनेने सरकार स्थापन केले. महिनाभर विस्तार नाही, विस्तार झाला तर आठवडाभर खातेवाटप नाही. आता तर सरकार स्थापन होण्यापूर्वीच मंत्र्याचा राजीनामा. ही या सरकारच्या पतनाची सुरूवात आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या सरकारने ना सरसकट कर्जमाफी दिली, ना गारपीटग्रस्तांना मदत केली. शेतकर्यांच्या सोबत सातत्याने विश्वासघाताची मालिका या सरकारने सुरू केली आहे. तीच गत अटींवर आधारित शिवभोजन या १० रूपयांत थाळी योजनेची आहे. संपूर्ण वाशीम जिल्हा मिळून केवळ ३०० लोकांना शिवभोजन मिळणार आहे, असेही ते म्हणाले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने उज्वला गॅस, प्रधानमंत्री आवास योजना, आरोग्यसेवा अशा अनेक पारदर्शी योजना सुरू केल्या. गरिबांसाठी अनेक योजना अतिशय प्रामाणिकपणे राबविले जात आहेत. केंद्राच्या योजनांचा थेट पैसा जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींकडे येतो. तो योग्य प्रकारचे वापरायचा असेल तर तेथे विकासाची आस असलेल्या आणि कास धरणार्या पक्षाचे सरकार असणे आवश्यक आहे. म्हणूनच भाजपाला निवडून देणे अतिशय आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.