फडणवीसांच्या निर्णयाला ब्रेक ;आता नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षांची निवड

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने यापूर्वीच्या फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सरकारने अजून एक निर्णय घेत देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला ब्रेक लावला आहे.यापूर्वी थेट जनतेमधून नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड करण्यात येत होती. हा निर्णय रद्द करण्यात आला असून,आता नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार आहे.
यापूर्वीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकांसाठी चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीने रद्द करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेवून फडणवीस सरकारने राष्ट्रवादी आणि कॅांग्रेसला राजकीय धक्का दिला होता.आता फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फेरविचार करण्यात आला आहे.आता नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीत अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्याची राज्यपालांना विनंती करण्यास आणि विधि व न्याय विभागाच्या सल्ल्याने अध्यादेशाचा मसूदा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली.

Previous articleधनंजय मुंडेंचा दणका; मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतीगृहाला १५ दिवसांत सुविधा मिळणार
Next article“नाईट लाईफला” हिरवा कंदिल;केवळ या ठिकाणीच परवानगी