रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असे होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो,माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून होती असे सांगतानाच,रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाव न घेता शिवसेनेला गुरूवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनत लगावला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन गुरूवारी येथे पार पडले.या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले.झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असे होत नाही.मी तोच आहे जो पूर्वी होतो,माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे.रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव न घेता टोला लगावला.बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावे ह्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढणार आहे.सीएए आणि एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्च्यांना उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्च्याने देणार आहे अशी घोषणाही त्यांनी आज केली.आज सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ह्या देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिम ह्या देशातून बाहेर हाकलून देण्याचा. आणि ह्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेंव्हा चुकले तेव्हा मीच त्यांच्यावर टीका केली पण जेंव्हा त्यांनी चांगली गोष्ट केली तर त्यांचे अभिनंदन करणारा मीच होतो. कलम ३७० असो की राममंदिराचा विषय असो त्यांचे अभिनंदन करणारा मीच होतो,केंद्र सरकारने प्रथम समझौता एक्स्प्रेस बंद करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी करीत आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार आहेत. उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.सरकारमधील जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित सरकारच्या खात्यांवर लक्ष ठेवणारे ‘शॅडो कॅबिनेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच घेऊन येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे.मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन असा इशारा देत झेंडा बदलणे ही काही नवीन गोष्ट नाही,ह्या आधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदलले आहे. १९८० साली जनसंघाचे नाव भारतीय जनता पक्ष झाले होते. हा सर्वसाधारण झेंडा नाही ह्यावर महाराजांची राजमुद्रा आहे त्यामुळे त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे. निवडणुकीच्या वेळेस राजमुद्रेचा झेंडा वापरायचा नाही, त्याचा आब राखला गेलाच पाहिजे.स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे,सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होते. ह्या पेक्षा काय वेगळे सोशल इंजिनिअरिंग असणार आहे असेही ते म्हणाले.

Previous articleकिमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष द्या
Next articleकेंद्राचे समाजातील मागासलेल्या वर्गाकडे दुर्लक्ष : शरद पवार