मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील मंत्र्याच्या शासकीय बंगल्यांवर सुशोभिकरणाच्या नावाखाली होणा-या खर्चाचा लेखा-जोखा महाराष्ट्रातील जनतेसमोर येणे आवश्यक आहे, तसेच शासकीय बंगले व घरासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची नियमावली निश्चित करावी आणि त्या नियमावली प्रमाणे योग्य तितक्याच खर्चाचे नियोजन करण्यात यावे,त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीतून होणा-या वारेमाप खर्चावर नियंत्रण येऊ शकेल अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच महाविकास आघाडीतील मंत्र्यांना खुश करण्याचे काम
या सरकारच्या माध्यमातून होत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
दरेकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कधी नव्हे तो शासकीय बंगल्याचं विषय चर्चेत आहे. एखाद्या जिल्ह्याचा विकास होईल इतका खर्च बंगल्यांची रंगरंगोटी आणि फर्निचरवर केला जातोय.विरोधी पक्ष नेत्यांचा जो बंगला आहे, मग ते माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील असो वा धनंजय मुंडे असतील, त्यांचे बंगले परंपरेप्रमाणे हे विरोधी पक्ष नेत्यांना मिळाले पाहिजे,पण महाविकास आघाडी सरकारने प्रथा परंपरेप्रमाणे विरोधी पक्ष नेत्यांना जागा व बंगला देण्याची प्रथा न पाळता केवळ महाविकास आघाडीतील मंत्र्यांना खुश करण्याचे काम दुदैवाने या सरकारच्या माध्यमातून होत असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
दरेकर पुढे म्हणाले, राज्यात बंगल्याच्या रंगरंगोटी आणि डागडुजीसाठी करोडांचा खर्च केला जातो, हि निंदनीय बाब आहे. एखाद्या बंगल्यावर किती खर्च व्हावा, जर स्वतःचा बंगला बसता तर आपण स्वतःच्या खिश्यातुन इतका खर्च केला असता का, याची आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. एका बाजूला जनता दुष्काळाने होरपळत आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकरी चिंताग्रस्त आहे .राज्यातील विविध अडचणी या जनतेपुढे असताना आम्ही आमचे बंगले सुसज्ज करायचे, त्याच्यावर वारेमाप खर्च करायचा हे चुकीचे आहे, असेही दरेकर यांनी नमुद केले.