मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करतानाच मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संपर्कात असल्याने विरोधकांच्या चुकीच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आज झालेल्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत केले.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्र्यांची आणि आमदारांची महत्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत विधानभवनात पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते.यावेळी उपस्थित आमदारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करतानाच मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॅांग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संपर्कात असल्याने तुम्ही विरोधकांच्या चुकीच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये मतभेद असल्याचा प्रचार विरोधकांकडून करण्यात येत आहे.त्याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न करून अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहून आक्रमक होण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची कायद्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मंत्र्यांची समिती नेमण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
गेल्या तीन महिन्यात तिन्ही पक्षांचा समन्वय उत्तम राहिला आहे,नुकतीच मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली,या बैठकीत अनेक मुद्द्यावर तासभर चर्चा झाली.महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहे, ३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांचे दोन लाखा पर्यंत कर्ज माफ केले जाईल असेही ठाकरे म्हणाले.आपण तीन पक्षांचे लोक एकत्र आलो आहोत.विधानसभा निवडणूक जरी आपण एकमेकांविरोधात लढलो असू तरी आता एकमेकांना सांभाळून पुढे जायचे ठरल्याने एकमेकांविरोधात तडजोडीच्या भूमिकेतून गेले पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजीत पवार म्हणाले.