पुरवणी मागण्यांमध्ये “बारामतीवर जोर मुंबई कमजोर”

मुंबई नगरी टीम
मुंबई : आघाडी सरकारने सादर केलेल्या ३९ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये बारामती वर जोर आणि मुंबई कमजोर असे चित्र दिसत आहे, अशी टीका भाजपा नेते, माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी करीत मुंबईतील दुर्लक्ष करण्यात आलेल्या विषयांकडे लक्ष वेधले.

विधानसभेत आज नगर विकास, वने आणि महसूल विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सहभागी होताना. आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबईकर असल्यामुळे मुंबईकरांसाठी एखादी पुरवणी मागणी जास्तीची करण्यात येईल अशी आशा आम्हाला होती मात्र सभागृहांसमोर आलेल्या पुरवणी मागण्यामध्ये बारामतीच्याच सर्वाधिक मागण्या असल्याचे दिसून येत आहे. बारामतीला देण्यास आमचा विरोध नाही मात्र मुंबईला थोडे झुकते माप मिळेल अशी आमची अपेक्षा मात्र होती. असे सांगत त्यांनी या मागण्यामध्ये बारामतीचा जोर आणि मुंबई कमजोर असे चित्र असल्याची टीका केली.

अवकाळी पाऊस झाल्यानंतर मी स्वतः कोकणचा दौरा केला.त्यावेळी कोकणातील नुकसान झालेल्या मच्छिमार आणि दुर्गम गावातील स्थिती सरकारकडे मांडली होती. वादळ आणि अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना तसेच संपर्क तुटलेल्या गावांना, उद्ध्वस्त स्मशानभूमीना या पुरवणी मागण्यामध्ये काही मिळेल असे अपेक्षित होते. तसेच खारदांडा येथील मच्छीमारांच्या २ बोटींचे वादळामुळे नुकसान झाले. त्यांना मदत मिळवी अशी मागणी केली होती. त्यांना देखील या पुरवणी मागण्यांमध्ये काही मिळाले नाही. तर कार्टर रोड येथील कांदळवन, कोस्टल रोड मुळे तोडणार अशी भीती स्थानिकांमध्ये असून त्या कांदळवनाचे नेमके काय करणार याची स्पष्टता सरकारने देणे अपेक्षित आहे. मुंबईसाठी नवे गारगाई धरण उभारण्यात येणार असून या धरणासाठी ४ लाख झाडे तोडावी लागणार आहेत. ४०० झाडे तुटतात म्हणून मेट्रो कारशेडचे काम आपण थांबविले मग आता गारगाई धरणामुळे तुटणाऱ्या झाडांचे आपण काय करणार याचे उत्तर सरकरने द्यावे आमचा विकासाला विरोध नाही मात्र पर्यावरणाचा प्रश्न कसा सोडविणार याबाबतचे खुलासा सरकारने करावा अशी मागणी त्यांनीसरकारकडे केली. मेट्रो १ चे ऑडीट सरकारने अद्याप केलेले नाही. रिलायन्सला या मेट्रोतून किती फायदा झाला याचे ऑडीट करणार आहात का ? असा सवाल ही त्यांनी केला. ३ (अ) ही मेट्रो भुयारी करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. याबाबत सरकारचे धोरण काय ? असा सवाल ही त्यांनी केला. तर मुंबई शहर आणि उपनगरला जोडणाऱ्या माहीम कॉजवेच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले, हा पूल १०० वर्षे जुना असून त्याची वेळीच डागडुजी करण्यात आली नाही तर भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू शकते त्यामुळे शहर आणि उपनगराचा संपर्क तुटू शकतो अशा महत्वाच्या ब्रिजच्या दुरुस्तीसाठी सरकारने तातडीने निधी उपलब्ध करावा अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात प्राथमिकता या कामाला देऊन तातडीने स्ट्रकचरल ऑडीट करण्यात येईल असे सांगितले.

Previous articleओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते पंतप्रधानांची भेट घेणार
Next articleवादग्रस्त श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द