मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकार मुस्लिम आरक्षण देणार असल्याचे वक्तव्य राज्यातील एक मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत केले आहे.हे सांगत असताना या आरक्षणाला शिवसेनेचा सुद्धा पाठिंबा आहे, असेही त्यांनी सांगितले आहे,त्यामुळे शिवसेनेने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केली.
अशाप्रकारचे आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास मराठा आणि ओबीसी आरक्षणावर सुद्धा त्याचा मोठा परिणाम होणार आहे, असे सांगताना ते म्हणाले की, धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले आहे आणि त्यामाध्यमातून मुस्लिमांना सुद्धा फायदा मिळतोच आहे.मुळात शिवसेना आपली भूमिका सोडून यासाठी राजी झाली आहे काय, हे त्यांनी स्पष्ट करावे. सत्तेसाठी शिवसेनेने काय-काय तडजोड केली, कुठे-कुठे सेटिंग केली, हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे असेही फडणवीस म्हणाले.